– तब्बल 40 जागांवर विजय मिळवला होता एनडीएने!!
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : “भाजपा दक्षिण में साफ, उत्तर मे हाफ” ही निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यानंतर काँग्रेसमध्ये लोकप्रिय झालेली घोषणा आहे. ही घोषणा देणे सोपे, पण प्रत्यक्षात तसे काम करणे अवघड अशी इंडी आघाडीची स्थिती आहे. कारण आज मतदान सुरू असलेल्या सहाव्या टप्प्यातल्या 58 जागांपैकी तब्बल 40 जागा 2019 मध्ये भाजप आणि त्याच्या मित्र पक्षांनी मिळवल्या होत्या. त्या जशाच्या तशा राखून उरलेल्या 18 जागांवर ही ताकद लावणे हे भाजपसाठी आव्हान होते, पण त्या पलीकडेच भाजपचा स्कोअर कमी करण्याचे जास्त अवघड आव्हान काँग्रेस आणि इंडी आघाडीपुढे आहे.
लोकसभेच्या सहाव्या टप्प्याचे मतदान शनिवारी होत आहे. या 58 जागांपैकी मध्ये भाजप आणि एनडीएने तब्बल 40 जागांवर विजय मिळवला होता. यात दिल्लीतील सर्व 7 आणि हरियाणातील सर्व 10 जागा जिंकल्या होत्या. यावेळी हरियाणात परिस्थिती कमालीची बदलली आहे. भाजप आणि इंडी आघाडीत यंदा थेट लढत असल्याने दोघांसाठीही हा टप्पा कमालीचा प्रतिष्ठेचा बनला आहे. आधीचे शाहीन बाग आंदोलन, शेतकरी आंदोलन आणि नंतरचे कुस्तीगीर आंदोलन आपल्याला राजकीय दृष्ट्या मदतीला येईल असा काँग्रेसचा होरा आहे. पण या तिन्ही आंदोलनांना मोदींच्या भाषणांनी छेद दिला आहे.
– पंजाब मध्ये विषम टक्कर
शेवटच्या दोन टप्प्यात भाजपसमोर आपले वर्चस्व कायम राखण्याचे आणि नवीन जागा जिंकण्याचे, असे दुहेरी आव्हान आहे. 25 मे आणि 1 जून या दोन शेवटच्या टप्प्यांत 115 जागांसाठी मतदान होणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीतील सर्वच्या सर्व तर पंजाबमध्ये फक्त 2 जागा जिंकल्या होत्या. यंदा पंजाबात अकाली दलाने साथ सोडली तरी काँग्रेसमधील 4 माजी खासदार, एक माजी मुख्यमंत्री यांच्यासारखे बडे नेते आयाराम भाजपला साथ देतील, अशी पक्षनेतृत्वाला आशा आहे.
हरियाणातील सर्व 10 जागा राखणे यंदा भाजपसाठी कमालीचे आव्हानात्मक आहे. शेतकऱ्यांची व जाट समाजाची भाजपवर मोठी नाराजी आहे. दिल्लीप्रमाणेच येथेही काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची आघाडी आहे. जेजपीचे दुष्यंत चौताला यांनीही भाजपपासून फारकत घेतली आहे. सत्ताविरोधी लाटेमुळे भाजपने ऐन निवडणुकीपूर्वीच येथे मुख्यमंत्री बदलले. मनोहरलाल खट्टर यांच्याऐवजी ओबीसी समाजातील नायबसिंग सैनी यांना मुख्यमंत्री केले. हरियाणातील तरुण मोठ्या संख्येने सैन्यात भरती होतात. यंदा विरोधकांनी अग्निवीर योजनेला मोठा मुद्दा बनवला आहे. पण त्याचा लाभ काँग्रेसला कितपत होईल??, याविषयी दाट शंका आहे.
दिल्लीत काय होणार?
दिल्लीतल्या 7 जागांवर भाजपचे खासदार आहेत, मात्र यावेळी काँग्रेस आणि आपच्या आघाडीचे आव्हान भाजपसमोर आहे. कथित दारु घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकले तरी न्यायालयाने अंतरिम जामीन त्यांना दिल्यावर ते प्रचारात प्रचंड सक्रिय झाले. याच दरम्यान आप खासदार स्वाती मालीवाल यांच्या मारहाणीवरून केजरीवाल यांना अडचणीत आणण्याची भाजपची रणनीती आहे. दिल्लीत काँग्रेसचे तीनपैकी फक्त जे. पी. अग्रवाल यांच्या विजयाची शक्यता लक्षात घेता भाजप येथे काँग्रेसवर कमी आणि आपवर मुख्य हल्लाबोल करत आहे.
इंडी आघाडीचा हाय जोश
काँग्रेसने अखेरच्या दोन्ही टप्प्यात सारी ताकद पणाला लावली आहे. दिल्ली-हरियाणात त्यांना आपची साथ मिळाल्याने दोन्ही पक्षांच्या केडरचा हाय जोश दिसतो. उत्तर भारतातील दिल्ली-पंजाब-हरियाणा ही तीनही राज्ये काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. बहुतांश हरियाणा आणि हिमाचलात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. 2019 मध्ये भाजपने या 4 राज्यांमध्ये चंदीगड मिळून 35 पैकी 24 जागा जिंकल्या होत्या. दोन जागा अकाली दलाच्या वाट्याला गेल्या. काँग्रेसला 8 जागा मिळाल्या होत्या. ‘आप’ला जी एकमेव जागा मिळाली ते पंजाबातील जालंधरचे एकमेव खासदार सुशील रिंकू यांना भाजपने यंदा आपल्याकडे ओढले आहे.
दिल्लीतील 7 ही जागांवर भाजपची हॅटट्रिक रोखण्यासाठी इंडी आघाडीने सारी शक्ती पणाला लावली आहे. यावेळी मी झाडूचे बटण दाबेन आणि केजरीवाल पंजाचे बटन दाबतील असे प्रचारात राहुल गांधी म्हणाले तरी स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणानंतर अखेरच्या दिवशी दोघांच्या संयुक्त सभेची कल्पना बारगळली.
भाजपने दहाही जागा जिंकलेल्या हरियाणात काँग्रेसने दीपेंद्रसिंह हुड्डा आणि कुमारी सेलजा यांसारखे मोठे चेहरे मैदानात उतरवले त्यामुळे पक्षाचे भाग्य बदलण्याची काँग्रेसला आशा आहे.
पंजाबमध्ये 13 पैकी 8 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसमधून परनीत कौर आणि रवनीत सिंग बिट्टूंसह अनेक काँग्रेस नेते भाजपवासी झाले. आता माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी, प्रदेशाध्यक्ष अमरिंदरसिंग राजा वाडिंग, सुखपाल सिंग खैरा, सुखजिंदर सिंग रंधावा, खासदार अमर सिंग, गुरजित सिंग औजला, विजय इंदर सिंगला आणि धरमवीर गांधी यांच्यासह कांग्रेस मैदानात भक्कम उभा आहे.
सहाव्या टप्प्यातील कांही प्रमुख उमेदवार
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (अनंतनाग-राजौरी), मंत्री धर्मेंद्र प्रधान (संबलपूर, ओडिशा), मंत्री राव इंद्रजीत व अभिनेता राज बब्बर (गुडगाव), केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर (फरीदाबाद), माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी (सुलतानपूर), मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार (ईशान्य दिल्ली), नवीन जिंदाल (कुरुक्षेत्र), बासुरी स्वराज (नवी दिल्ली), मनोहरलाल खट्टर (कर्नाल), कुमारी शैलजा आणि अशोक तंवर (सिरसा), अरविंद शर्मा व दीपेंद्रसिंह हुड्डा (रोहतक).