विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून परागंदा व्हावे लागल्यानंतर त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पंतप्रधानपद आणि देश सोडल्यानंतर बांगलादेशच्या अंतरिम सरकारने शेख हसीना, त्यांच्या कॅबिनेट मंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या खासदारांविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. अंतरिम सरकारच्या या निर्णयामुळे नेत्यांना व्हिसामुक्त देशांमध्ये प्रवास करता येणार नाही.
त्याचवेळी शेख हसीना यांना बांगलादेशात परतणेही कठीण झाले असून बांगलादेश सरकारने त्यांच्या विरोधात आणि क्रिकेटपटू शाकिब अल हसन याच्या विरोधात बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनादरम्यान हत्या केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. शाकिब अल हसन हा शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षाचा नेता असून तो मावळत्या जातीय संसदेत खासदार देखील होता.
विद्यार्थी आंदोलनादरम्यान त्याने पोलिसांना आंदोलकांवर गोळीबार करून त्यांना ठार मारण्यासाठी चिथावणी दिली, असा गुन्हा नव्या सरकारने त्याच्याविरुद्ध दाखल केला आहे. रुबल या आंदोलक विद्यार्थ्यांची हत्या केल्याचा गुन्हा शाकिब याच्यावर दाखल केला असून शाकिब सध्या पाकिस्तान मध्ये बांगलादेशी टीम कडून पाकिस्तान विरोधात कसोटी सामने खेळत आहे. कसोटी मालिका संपवून शाकिब परत आल्यानंतर त्याला बांगलादेशी पोलीस अटक करू शकतात, असे बांगलादेशी वृत्तपत्रांनी बातम्यांमध्ये नमूद केले आहे.
शेख हसीना सरकारने विद्यार्थी आंदोलकांविरोधात पोलिसांचा अमानूष वापर केला. पोलिसांमार्फत विद्यार्थी आंदोलकांच्या हत्या केल्या. या संदर्भातले गुन्हे शेख हसीनांवर दाखल केले आहेत.
Vinesh Phogat : विनेश फोगटने दिल्ली पोलिसांवर केला ‘हा’ मोठा आरोप!
डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द
डॉ. मुहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने शेख हसीना यांच्या सरकारच्या काळात खासदारांना दिलेले सर्व डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द केले. यामध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पासपोर्टही रद्द करण्यात आला आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि खासदारांच्या पासपोर्टचाही समावेश आहे. ज्यांच्याकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट आहेत त्यांना काही देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवासासह अनेक विशेषाधिकार मिळत असतात.
याबाबत गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अंतरिम सरकारने डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यांना सामान्यतः लाल पासपोर्ट म्हणून ओळखले जाते, कारण हे लोक आता अधिकृत पदांवर राहिले नाहीत.
ते म्हणाले की, ते आता त्यांच्या पदावर राहणार नसल्याने त्यांचे पासपोर्ट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, गृहमंत्रालयाने याप्रकरणी पासपोर्ट विभागाला केवळ तोंडी सूचना दिल्या आहेत, असे ते म्हणाले. याबाबत अद्याप कोणतीही औपचारिक अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही.
Bangladesh All Rounder Shakib Al Hasan & Sheikh Hasina named Murder case
महत्वाच्या बातम्या
- Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील फार्मा कंपनीच्या प्लांटमध्ये भीषण स्फोट, 15 ठार, 40 जखमी
- Lakda shetkari Yojana : लाडक्या बहिणींच्या पाठोपाठ महाराष्ट्रात लाडका शेतकरी योजना; मुख्यमंत्र्यांची घोषणा!!
- Madhya Pradesh : ‘या’ राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या तारखांमध्ये झाला बदल!
- Champai Soren : चंपाई सोरेन यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची केली घोषणा!