नाशिक : कृत्रिम बुद्धिमत्तेची कमाल, नाशकात बाळासाहेब गरजले; उद्धवचे स्क्रिप्ट वाचून भाजपला धुवावे लागले!! उद्धव ठाकरेंनी आयोजित केलेल्या नाशिक मधल्या निर्धार मेळाव्यात हे घडले.
एक अभिनव कल्पना म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI मधून वाजवायचे ठरविले. यानिमित्ताने बाळासाहेबांचा आवाज पुन्हा ऐकण्याची संधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सगळ्या महाराष्ट्राला दिली. पण हे मुळात बाळासाहेबांचे भाषण होतेच कुठे??, ते तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे अन्य व्यक्तीने लिहिलेले स्क्रिप्ट बाळासाहेबांना “वाचावे” लागले. अर्थातच ते स्क्रिप्ट उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या साह्याने लिहिले होते. त्यामुळे अगदी 2024 च्या विधानसभा निवडणुकीतले संदर्भ देखील त्यात उमेदवारांच्या नावांसह आले होते.
एरवी बाळासाहेबांचे भाषण म्हणजे कुठले स्क्रिप्ट रायटिंग नाही किंवा वाचन नाही. ते रसरशीत आणि धगधगीत हिंदुत्वाच्या ज्वालामुखीचे भाषण असायचे, त्यातून शिवसैनिकांमध्ये अंगार फुलायचा. पण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे बाळासाहेबांनी केलेले भाषण त्यांच्या मूळ भाषणाच्या जवळपासही पोहचू शकले नाही.
बाकी बाळासाहेबांनी ज्या स्टाईलने पूर्वी भाजपच्या कमळाबाईला धुतले होते, त्याच स्टाईलने नाशिक मध्येही कमळाबाईला धुतले, पण त्यामध्ये नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस वगैरे एडिशन्स उद्धव ठाकरे यांच्या स्क्रिप्ट मधून त्यांना घ्याव्या लागल्या.
कृत्रिम बुद्धिमत्तेतून बाळासाहेब म्हणाले :
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. आज तुफान गर्दी दिसत आहे. नाशिक म्हटल्यावर गर्दी उसळणारच. नाशिक आणि शिवसेनेचे एक नाते नाही म्हटले तरी आहेच आणि ते राहणारच. नरेंद्र मोदी म्हणतात, तसे हे नाते नाही. नासिक से मेरा पुराना नाता है, मैं यहा वीर सावरकरजी के साथ काम करता था और जॅक्सन के वध में मेरा ही प्लॅनिंग था. अरे जातील तिथे गंडवायचे आहे आणि लोकही गंडतात. ही काही नाती जपणारी माणसे नाहीत. कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे.
भाजपला महाराष्ट्रात काय, देशात कोणी ओळखत नव्हते, तेव्हा आम्ही त्यांना आधाराचा खांदा दिला. महाराष्ट्रात त्यांना आम्हीच वाढवले. पण आता त्यांना खांदा द्यायची वेळ आली आहे. 25 वर्षे आमचे एक नाते त्यांच्याबरोबर नक्कीच होते, अर्थात हिंदुत्व म्हणून. महाराष्ट्रात शिवसेनेमुळेच ते वाढले. मग नाते तोडले कोणी? माझ्या पोतडीत यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत. हळूहळू काढतो, त्यातच मजा असते. नाहीतर एकदम खेळ आटोपून जाईल.
– शिवसेनेने कधीच कोणाच्या पाठीत वार केला नाही, पण आज महाराष्ट्राच्या पाठीत वार सुरू आहे. हा सगळा पैशांचा खेळ आहे. महाराष्ट्राला एवढे इंग्रजांनी आणि मुघलांनी लुटलं नव्हतं, जितके हे भाजपवाले लुटत आहेत. ते सुद्धा हिंदुत्वाच्या नावाखाली. भारतीय जनता पक्षाला आम्ही हिंदुत्वासाठी मोठे केले, पण आज हिंदुत्वाचे खरे मारेकरी कोणी असतील तर ते हेच लोक आहेत. हिंदुत्व तुमचे खाजगी मालमत्ता नाही. हिंदू-हिंदूंमध्ये भांडणे लावली जात आहेत, जाती, पोटजातीमध्ये मारामाऱ्या लाऊन ते नाना फडणवीस मजेणे बघत आहेत. एक गोष्ट ठासून सांगतो. तुमचे शंभर बाप खाली उतरले तरी शिवसेनेचे अस्तित्व तुम्ही संपवू शकणार नाही.
हे गद्दार एक साथ दिल्लीपुढे स्वत:ची सिलिंडरे उभे करून मुजरे झाढत आहेत. त्यासाठी शिवसैनिकांनी त्याग आणि बलिदान दिले का?? आणि त्यासाठीच 106 हुतात्म्यांनी घरावर, संसारावर तुळशीपत्र ठेवले?? मी महाराष्ट्राच्या राजकारणात गरम रक्ताची मर्द पिढी उभी केली होती. काय झाले त्या उसळणाऱ्या गरम रक्ताचे?? गद्दार गेले ते गेले. त्यांच्या स्वाभिमानाच्या गोवऱ्या सुनापुरात गेले. त्यांना पैसा, अडका, मंत्रिपदाच्या वतनदाऱ्या आज मिळाल्यात. पण इतिहासात तुमची नोंद फितूर आणि महाराष्ट्राचे गद्दार म्हणूनच राहणार!!
गंगेत कितीही डुबक्या मारल्यात, तरी हे पाप, हा गद्दारीचा डाग धुतला जाणार नाही. या गद्दारांनी जिवंतपणीही माझ्या पाठीवर वार केलेच, पण मृत्युनंतरही घाव सुरूच आहे, असे बाळासाहेब ठाकरे यांच्या एआय भाषणात म्हटले. ज्या इमान, निष्ठेतून शिवसेनेचा अंगार निर्माण झाला, त्यावर बेईमानाच्या गुळण्या टाकणारे तुमच्या रक्ताचे, हाडामांसाचे लोक आहेत. छत्रपती शिवरायांच्या, छत्रपती संभाजी महाराजांच्या नशिबी जे स्वकीयांकडून बेईमानीचे घाव आले, तेच आमच्याच नशिबी आले. पण याद राखा गद्दारांनो, तुमचे हे नीच मनसुबे पूर्ण होणार नाही!!