विशेष प्रतिनिधी
मुंबई : बदलापूर ( Badlapur ) पूर्व येथील आदर्श शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थींनीवर अत्याचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज हजारो बदलापूरकर नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांच्या उग्र आंदोलनामुळे बदलापुरातील प्रतिष्ठित शाळेचा बुरखा फाटला असून सकाळपासून पालकांनी आदर्श शाळेबाहेर आंदोलन सुरू केले, तर काही नागरिकांनी उपनगरीय रेल्वेची वाहतूक रोखून धरली, त्यामुळे मध्य रेल्वे ठप्प झाली. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला अटक केल्याची माहिती दिली. तसेच त्याच्यासह या प्रकरणातल्या आरोपींना लवकर शिक्षा मिळावी यासाठी हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात सुनावणीसाठी घेतले जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पोलीस आयुक्तांशी मी चर्चा केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली असून त्यावर खुनाचा प्रयत्न, बलात्काराचा प्रयत्न, पोक्सो अशी कठोर कलमे लावण्याचे आदेश दिले आहेत. जलदगती न्यायालयात हा खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहीजे, असे निर्देश मी दिले आहेत. जेणेकरून पुन्हा कुणी असे धाडस करणार नाही. तसेच संस्था चालकांवरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संस्थाचालकांनी कर्मचाऱ्याला कामाला ठेवण्याआधी त्याची पार्श्वभूमी तपासणे गरजेचे आहे. यासाठी लवकरच नियमावली जाहीर केली जाईल. या प्रकरणात जे जे दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पालकांना आवाहन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तुमच्या मुली या माझ्या मुली आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. सरकार संवेदनशील असून कठोर कारवाई करू, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्यातील माता-भगिनी सुरक्षित नाहीत आणि आता बदलापूरच्या प्रसंगातून शाळेतल्या चिमुकल्या विद्यार्थींनीही सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. एकीकडे लाडकी बहीण योजना आणून सरकार जाहिरातबाजी करत आहे. उरण, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरला नुकत्याच महिला अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत. असे असताना बदलापूरला घडलेली घटना निषेधार्ह आहे. आंध्र प्रदेशमध्ये बलात्कार करणाऱ्या आरोपींना चकमकीत ठार मारले गेले होते, अशाच प्रकारची शिक्षा बलात्कार प्रकरणातील आरोपींना दिली गेली पाहीजे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
गुन्हेगारावर कडक कारवाई झाली पाहीजे, अशीही आमची मागणी आहे. जे लोक हिंदू जनआक्रोश मोर्चा काढतात, त्यांना बदलापूरच्या हिंदू महिलांचा आक्रोश दिसत नाही का? उरण, नवी मुंबईतही हिंदू महिलेवरच अत्याचार झाले होते, मात्र हे अत्याचार हिंदू जनआक्रोश करणाऱ्यांना दिसणार नाहीत, असाही आरोप अंबादास दानवे यांनी केला.
नेमके प्रकरण काय?
बदलापूर पूर्वेतील आदर्श या नामांकीत शैक्षणिक संस्थेत हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शाळेतील छोट्या शिशु वर्गात शिकणाऱ्या तीन वर्षांच्या दोन मुलींवर हा प्रसंग घडला. एका मुलीने आपल्या पाल्यांना शाळेतील दादा नावाने परिचीत असलेल्या एका व्यक्तीने आपल्या गुप्तांगाला हात लावल्याची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी त्या मुलीच्या वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांना याबाबत कळवले. त्यांना संशय आल्याने त्यांनी आपल्या मुलीला बदलापूर पूर्वेतील एका रूग्णालयात तपासणीसाठी नेले.
या तपासणीनंतर रूग्णालयाने त्यांना अत्याचार झाल्याबाबत दुजोरा दिला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दिली. मात्र बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात मोठा वेळ घेतल्याचा आरोप पालकांनी केला. आरोपीचे नाव माहिती असूनही अखेर याप्रकरणी १६ ऑगस्ट रोजी रात्री 10.00 सुमारास अनोळखी इसमाविरूद्ध गुन्हा दाखल केला. भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
Badlapur rape case agitation
महत्वाच्या बातम्या
- Eknath shinde : मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्यांचा संकल्प, राज्यातील बहिणींची कृतज्ञता
- Narendra modi :पंतप्रधान मोदी जगाला चकित करणार, रशियानंतर आता थेट युक्रेनला जाणार!
- Monkey Pox Principal Secretary : ‘मंकी पॉक्स’बाबत मोठी बैठक, प्रधान सचिव म्हणाले परिस्थितीवर पंतप्रधानांची नजर!
- Vishwa Hindu Parishad : मागासवर्गीयांना आपलेसे करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेची देशभरात तब्बल 9000 ब्लॉक मध्ये धर्मसभा आणि संमेलने!!