वृत्तसंस्था
अमृतसर : पंजाब मध्ये आज प्रचाराचा सुपर संडे ठरला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी ठिकठिकाणी पंजाब मध्ये भाजप आणि काँग्रेस यांचा प्रचार केला. या दोन्ही नेत्यांच्या सभांची वैशिष्टे पाहिले तर या दोघांनीही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टार्गेट केले.Amit Shah – Priyanka on Punjab tour
पंजाब मध्ये काँग्रेसची खरी लढत अकाली दलाशी नसून आम आदमी पार्टीची आहे, हेच प्रियांका गांधी यांच्या विविध वक्तव्यातून स्पष्ट झाले. आम आदमी पार्टीचा जन्म राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला आहे. 2012 च्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून त्यांना खऱ्या अर्थाने बळ मिळाले आहे, असे टीकास्त्र प्रियांका गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर सोडले. त्याच वेळी केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून बळ घेतले असले तरी अण्णांनंतर वार्यावर सोडले. दिल्लीतल्या जनतेसाठी देखील त्यांनी काही केले नाही आणि आता पंजाब मध्ये येऊन ते जनतेला भूलथापा देत आहेत, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
दुसरीकडे अमित शहा यांनी देखील अरविंद केजरीवाल यांनाच टार्गेट केले असून अरविंद केजरीवाल हे पंजाबमध्ये येऊन जनतेची सेवा करण्याच्या बाता करतात. जनकल्याणाच्या योजना राबवण्याचा आव आणतात पण दिल्लीत दोन वेळा पूर्ण बहुमताने सत्तेवर येऊन देखील एकही शीख व्यक्तीला केजरीवालांनी मंत्री बनवले नाही. यातूनच त्यांचे पंजाब आणि पंजाबीयत वरचे प्रेम दिसून येते, असे खोचक उदगार अमित शहा यांनी काढले.
प्रियांका गांधी आणि अमित शहा हे एकमेकांच्या पक्षांवर जोरदार तोफा डागत असतात. परंतु, आज मात्र पंजाबचा प्रचार दौऱ्यात त्यांनी एकमेकांच्या पक्षांवर टीका जरूर केली पण त्यांचे मुख्य टार्गेट हे अरविंद केजरीवाल हे राहिले. यातून पंजाबचा निवडणुकीत अरविंद केजरीवाल फॅक्टर किती महत्त्वाचा आहे हे आता अधोरेखीत झाले आहे.