विशेष प्रतिनिधी
जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच अयोध्या येथील राम मंदिराचा खटला जिंकला. लगेच राम मंदिराचे काम सुरू केले पूर्णही केले. काँग्रेस व इंडिया आघाडीच्या नेत्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले. मात्र, ते वेगवेगळी कारणे सांगून गैरहजर राहिले. त्यांची व्होटबँक नाराज होईल म्हणून ते गैरहजर राहिले. इंडिया आघाडी चुकून सत्तेवर आलीच तर राम मंदिराला बाबरी नावाचे मोठे कुलूप लावतील, असा हल्लाबाेल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. ते जालना येथे भाजप महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ बुधवारी शहरात सभेत बोलत होते.Amit Shah attacks Congress in Jalanya meeting; If the alliance comes to power, they will put a big lock called Babri on the Ram temple
शाह म्हणाले, सध्या पाकिस्तान राहुल गांधींवर खुश आहे. पाकिस्तानचे लाेक दररोज राहुल गांधींचे समर्थन करत आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करतात, सर्जिकल स्ट्राइक करतात तेव्हा राहुल गांधी त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. मोदी अतिरेक्यांना, नक्षलवाद्यांना कंठस्नान घालतात. त्यावर राहुल गांधी प्रश्नचिन्ह निर्माण करतात. सीएए कायदा रद्द करू, असेही ते म्हणतात. सीएए परत आणू म्हणत आहेत. अशा प्रकारे पाकिस्तानचा अजेंडा भारतात चालवण्याचे काम राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष करत असल्याचा आरोप गृहमंत्री अमित शाह यांनी केला.
जालना शहरातील फ्रेझर बॉइज स्कूलच्या मैदानावर सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ.भागवत कराड, अर्जुन खोतकर, मंत्री अतुल सावे आदींची उपस्थिती होती. या वेळी गृहमंत्री शाह यांनी राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. कोरोनाकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेची सेवा करत होते तेव्हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी कोरोना रुग्णांच्या खिचडीतील मलई खात होते.औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर व्हावे, अशी मागणी स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच केली होती.
जेव्हा आम्ही औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले तेव्हा उद्धव ठाकरे त्यावर प्रतिक्रियाही देऊ शकले नाहीत. कारण ते पद मिळवण्यासाठी अशा लोकांसोबत बसले आहेत, जे लोक या देशात ट्रिपल तलाक, सीएए कायदा पुन्हा आणू इच्छित आहेत. दोन दिवसांनी उद्धव ठाकरे जालन्यात येतील तेव्हा जालनेकरांनी त्यांना यासंदर्भात जाब विचारला पाहिजे, असे अवाहन शाह यांनी केले.
काँग्रेस खासदारांकडे ३५०, ममतांच्या पीएकडे ५० कोटी रुपये सापडले
काँग्रेसच्या खासदाराकडे ३५० कोटी रुपये सापडले. ममता बॅनर्जी यांच्या पीएकडे ५० कोटी, झारखंडच्या एका मंत्र्यांच्या पीएकडे ३० काेटी रुपये सापडले. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी घाेटाळे करून हा पैसा कमावला आहे. त्यांनी १२ लाख कोटींचा घोटाळा केल्याचा आराेप शाह यांनी केला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली २३ वर्षे,मुख्यमंत्री,पंतप्रधान आहेत. मात्र, त्यांच्यावर २५ पैशाचाही आरोप कुणी करू शकले नाही, असे शाह म्हणाले.