वृत्तसंस्था
पणजी : भंडारी समाजातील वरिष्ठ वकील अमित पालेकर हे गोव्यात आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पणजी मध्ये पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. Amit Palekar Aam Aadmi Party’s Chief Ministerial candidate in Goa
आम आदमी पार्टी पंजाब आणि गोव्यामध्ये मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर करून प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. बाकी कोणत्याही पक्षांनी दोन्ही राज्यांमध्ये मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
अमित पालेकर हे गोव्यातील भंडारी समाजातुन येत असून ते वरिष्ठ वकील आहेत. आम आदमी पार्टीत गेली सात वर्षे ते काम करत आहेत. गोव्यात आम आदमी पार्टीचे संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी काम केले आहे. आता त्यांच्या नेतृत्वाखाली आदमी पार्टी गोव्यात विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. याआधी पंजाब मध्ये संगरूरचे खासदार भगवंत मान यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांनी परवाच घोषणा केली आहे. या पाठोपाठ अमित पालेकर यांची गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करून आम आदमी पार्टीने नेतृत्वाची दुसरी फळी यानिमित्ताने पुढे आणली आहे.
दिल्लीत मनीष सिसोदिया हे अरविंद केजरीवाल यांच्या पाठोपाठ आम आदमी पार्टीचे मोठे नेते आहेत. आता भगवंत मान आणि अमित पालेकर हे आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार झाल्यानंतर त्यांचेही पक्षात निर्णायक पातळीवर महत्त्व वाढणार आहे. या निमित्ताने संघटनात्मक पातळीवर नेतृत्वाच्या विविध स्तरावरच्या फळ्या तयार करण्याचे काम अरविंद केजरीवाल करताना दिसत आहेत.