प्रमुख अजेंड्यांवर होणार चर्चा winter session
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 25 नोव्हेंबरपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. याआधी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सर्वपक्षीय बैठक रविवार, 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता मुख्य समिती कक्ष, संसद भवन ऍनेक्सी, नवी दिल्ली येथे होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.
सर्वपक्षीय बैठकीमध्ये मणिपूर हिंसाचार व्यतिरिक्त विधिमंडळ कामकाज, राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक चिंता आणि प्रादेशिक समस्यांसारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. संसदीय परंपरेनुसार, ही बैठक विरोधी पक्षांना त्यांच्या विधीमंडळाच्या अजेंडाची माहिती देण्यासाठी तसेच पक्षांना संसदेत ज्या मुद्द्यांवर चर्चा करायची आहे त्यावर चर्चा करण्यासाठी सरकारकडून बोलावले जाते. अशा बैठकीद्वारे सरकार अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षांकडून औपचारिकपणे सहकार्य मागते.
संसदेचे अधिवेशन 25 नोव्हेंबरला सुरू होऊन 20 डिसेंबरला संपणार आहे. जुन्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये संविधान स्वीकारल्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकार पाच नवीन कायद्यांसह 15 विधेयके मांडण्याच्या तयारीत आहे. पाच नवीन विधेयकांमध्ये सहकारी विद्यापीठ स्थापन करण्याच्या विधेयकाचाही समावेश आहे. प्रलंबित विधेयकांमध्ये वक्फ (सुधारणा) विधेयकाचाही समावेश आहे, जे दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीने लोकसभेला आपला अहवाल सादर केल्यानंतर विचारार्थ आणि पारित करण्यासाठी सूचीबद्ध केले गेले आहे.