वृत्तसंस्था
गुवाहाटी – आसाममध्ये अल्पसंख्याक समूदायाच्या कल्याणासाठी तसेच लोकसंख्या विस्फोट रोखण्यासाठी मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी खास कार्यक्रम हाती घेतला असून राज्यातील विस्थापित मुस्लीम समूदायासाठी लवकरच आलाप आलोचना उपक्रमाची बैठक घेण्यात येईल, असे विश्वकर्मा यांनी स्पष्ट केले.
अल्पसंख्यांक समूदायातील साहित्यिक, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, इतिहास अभ्यासक, संगीतकार, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते आदी १५० मान्यवर हेमंत विश्वशर्मा यांनी आयोजित केलेल्या आलाप आलोचना या संवादात सहभागी झाले होते.
अल्पसंख्याक समूदायाच्या कल्याणासाठी शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास, आर्थिक सामीलीकरण, लोकसंख्या स्थिरीकरण, आसामची सांस्कृतिक ओळख या महत्त्वाच्या विषयांवर काम करण्यासाठी ८ उपगट नेमण्याची सूचना अल्पसंख्यांक समूदायातील बुध्दिमंतांनी केली. त्यावर एकमत झाल्याची माहिती हेमंत विश्वशर्मा यांनी दिली. येत्या दोन तीन महिन्यांमध्ये अशा प्रकारच्या बैठकांचे नियमित आयोजन केले जाईल. त्यामध्ये अल्पसंख्यांक कल्याणाच्या पुढच्या ५ वर्षांचा कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात येईल, असे हेमंत विश्वशर्मा यांनी स्पष्ट केले.
वैशिष्ट्यपूर्ण आसामी मुस्लीम समूदायाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. परंतु, आसामच्या काही विशिष्ट भागांमध्ये जो लोकसंख्येचा स्फोट झाला आहे, त्यामुळे राज्याला धोका उत्पन्न झाला आहे. विशेषतः आर्थिक प्रगतीत त्याचा मोठा अडथळा तयार झाला आहे, यावर आलाप आलोचना कार्यक्रमात एकमत झाले, अशी माहिती हेमंत विश्वशर्मा यांनी दिली.
देशातल्या लोकसंख्या विस्फोटाच्या ५ मोठ्या राज्यांपैकी आसाम हे एक राज्य झाले आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणावर काम करणे हे आपले आसामी नागरिक म्हणून कर्तव्य आहे, यावर आलाप आलोचना कार्यक्रमामध्ये भर देण्यात आला.