काँग्रेसच्या पुढाकाराने 26 पक्षांची INDI आघाडी होऊन देखील उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी काँग्रेसला उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल मध्ये धुत्कारण्यामागे वेगळेच कारण आहे. ते केवळ वैयक्तिक मान – अपमानाचे नसून त्यापलीकडे जाऊन समाजवादी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसची मुस्लिम व्होट बँक काँग्रेस आपल्याकडे खेचून घेण्याची भीती अखिलेश आणि ममता या दोन्ही नेत्यांना वाटत आहे.
अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांचे राजकारण मूळातच अल्पसंख्यांक व्होट बँकेवर विसंबून आहे. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या वडिलांनी म्हणजे मुलायम सिंह यादव यांनी मुस्लिम – यादव (एम – वाय) हे समीकरण फीट बसवले होते. या समीकरणातून मधून मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांनी दोनदा उत्तर प्रदेशची सत्ता भोगली, पण भाजपने हे समीकरण तोडले आणि राज्यावर हिंदू व्होट बँकेची पकड मजबूत केली.
पण तरी देखील अखिलेश यादव अजूनही त्यांच्या जुन्याच राजकारणाच्या पठडीत अडकले आहेत आणि त्यांना आजही मुस्लिम – यादव (एम – वाय) हेच समीकरण खुणावते आहे. आता या “एम – वाय” समीकरणात काँग्रेसचा शिरकाव झाला, तर “एम” म्हणजे मुस्लिमांची मते काँग्रेस स्वतःकडे खेचेल आणि त्याचा दुष्परिणाम समाजवादी पार्टीच्या व्होट बँकेवर होईल, अशी भीती अखिलेश यादवांना वाटत आहे. त्यामुळेच ते उत्तर प्रदेशात काँग्रेस बरोबर आघाडी करण्याचे टाळत आहेत.
पण याचा अर्थ “एम – वाय” समीकरणातली मधली “एम” म्हणजे मुस्लिम मते खेचण्याची काँग्रेसची फार मोठी क्षमता आहे असे नव्हे, पण मुस्लिम व्होट बँकेतली 2 – 5 % मते जरी काँग्रेसने खेचली, तरी समाजवादी पार्टीचे होणारे नुकसान हे 5 – 10 % टक्क्यांच्या मतांचे राहील आणि परिणाम म्हणून लोकसभा आणि विधानसभेत समाजवादी पार्टीला फार मोठा फटका बसेल, अशी अखिलेश यादव यांची अटकळ आहे म्हणूनच अखिलेश यादव आपल्याला भारत जोडो यात्रेचे निमंत्रण नाही असा कांगावा करत काँग्रेस पासून “सुरक्षित” अंतर राखत आहेत.
उत्तर प्रदेश मध्ये जे अखिलेश यादव यांचे गणित आहे, तेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे गणित आहे.
कारण उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये लोकसभेच्या अनुक्रमे 29 आणि 13 मतदारसंघांवर “विशिष्ट मुस्लिम प्रभाव” आहे. म्हणजे तेथे मुस्लिमांची मतांची टक्केवारी 12 % ते 20 % पर्यंत आहे. त्यामुळे ही एकगठ्ठा मते जर समाजवादी पार्टी अथवा तृणमूळ काँग्रेसला मिळाली, तर त्यांचा विजय तिथे सोपा होतो, असा अखिलेश आणि ममता या दोन्ही नेत्यांचा होरा आहे. म्हणूनच ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल मध्ये एक पाऊल पुढे जाऊन काँग्रेसला पूर्णपणे राज्यातून ढकलूनच दिले आहे.
पश्चिम बंगाल मध्ये 42 पैकी 13 जागांवर मुस्लिम प्रभाव असल्याने तिथल्या मुस्लिम मतांच्या टक्केवारीत ममता बॅनर्जींना बिलकुलच काँग्रेसची हिस्सेदारी नको आहे. कारण ही हिस्सेदारी काँग्रेसने खेचली, तर तृणामूळ काँग्रेसला 13 जागांवर फार मोठा फटका बसण्याचा धोका ममतांना वाटतो.
– साप – मुंगसाचे नाते
शिवाय ममता आणि काँग्रेस यांचे साप – मुंगसाचे नाते आहे. ममता बॅनर्जी या काँग्रेस नेतृत्वाला बिलकुलच जुमानत नाहीत. सोनिया गांधी यांच्यापासून देखील त्या विशिष्ट अंतर राखूनच राहतात, त्यामुळे बाकीच्या नेत्यांना गिनायचे कारणच त्यांना उरत नाही.
पण त्या पलीकडे जाऊन पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश मधली वस्तुस्थिती हीच आहे की, अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांना आपापल्या पक्षांच्या मुस्लिम व्होट बँकेमध्ये काँग्रेस सारखा प्रभावी वाटेकरी नको आहे आणि म्हणूनच काँग्रेसला उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांमधून धुत्कारण्याचे काम सुरू आहे.
Akilesh and Mamata fears dent in their Muslim vote bank by Congress
महत्वाच्या बातम्या
- अधीर रंजन यांचा पलटवार- ममता दीदी भाजपला घाबरतात, म्हणूनच त्या त्यांची भाषा बोलतात
- इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीला ‘बेकायदेशीर विवाह’ प्रकरणी 7 वर्षांची शिक्षा
- पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी राष्ट्रपतींकडे पाठवला राजीनामा
- अजितदादांच्या राष्ट्रवादीचा “सेक्युलर” पर्याय निवडून मुंबईतल्या काँग्रेसच्या मुस्लिम आमदारांचा भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येण्याचा डाव!!