गृह मंत्रालयाने जारी केले नोटिफिकेशन AFSPA
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गृह मंत्रालयाने मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये 6 महिन्यांसाठी सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) लागू केला आहे. यामध्ये, मणिपूरच्या ५ जिल्ह्यांतील १३ पोलिस स्टेशन क्षेत्र वगळता संपूर्ण राज्यात पुढील ६ महिन्यांसाठी AFSPA वाढवण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेशातील तिरप, चांगलांग आणि लोंगडिंग जिल्ह्यांमध्ये आणि राज्यातील तीन पोलिस स्टेशन क्षेत्रातही AFSPA लागू करण्यात आला आहे.
नागालँडमधील ज्या जिल्ह्यांमध्ये AFSPA पुन्हा लागू करण्यात आला आहे ते म्हणजे दिमापूर, निउलंड, चुमोकेदिमा, मोन, किफिरे, नोकलाक, फेक आणि पेरेन.
AFSPA म्हणजे काय?
अशांत भागात AFSPA लागू केला जातो. या कायद्यानुसार, सुरक्षा दलांना लक्षणीय अधिकार मिळतात. याअंतर्गत, सुरक्षा दलांना वॉरंटशिवाय कोणालाही अटक करण्याचा अधिकार आहे. तसेच, त्याच्या कायद्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये बळाचा वापर करण्याची तरतूद आहे. AFSPA फक्त अशांत भागात लागू केला जातो.