• Download App
    सनातन धर्माला शिव्या देण्यात मोदी विरोधक दंग; भाजपची पुरती "काँग्रेस" करण्याचा त्यांनी बांधलाय चंग!!! abusing sanatan dharma Congress and opposition leaders are assuring BJP's a nationwide landslide victory

    सनातन धर्माला शिव्या देण्यात मोदी विरोधक दंग; भाजपची पुरती “काँग्रेस” करण्याचा त्यांनी बांधलाय चंग!!

    सनातन धर्माला शिव्या देण्यात मोदी विरोधक दंग, कारण भाजपची पुरती “काँग्रेस” करण्याचा त्यांनी बांधलाय चंग!!, हे शीर्षक वाचून थोडे गडबडायला होईल. लेखक जरा “सरकलाय” का??, असेही वाटेल, तसे वाटले, तर ते स्वाभाविक मानले पाहिजे. कारण लेखाला शीर्षकच तसे दिले आहे. By abusing sanatan dharma Congress and opposition leaders are assuring BJP’s a nationwide landslide victory and making BJP like an old nationwide Congress party!!

    पण ही वस्तुस्थिती नाही, तर देशात काहीही होवो, आमचे कितीही आणि कसेही पराभव होवोत, भाजपचे कितीही आणि कसेही विजय होवोत, आम्ही सुधारणार नाही, ही विरोधकांची मानसिकता वर्णन करणारे शीर्षक या लेखाला दिले आहे. ते का दिले??, हे नीट लक्षात घेतले, तर त्याचा नेमका अर्थ समजेल!!

    5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये 3 राज्ये भाजपने जिंकली, 1 राज्य काँग्रेसला मिळाले, तरी देखील काँग्रेस आणि त्याच्या मित्र पक्षांचे डोळे उघडले नाहीत. त्यांची सनातन धर्माला शिव्या देण्याची सवय गेली नाही. निकाल लागून दोनच दिवस उलटले. त्यानंतर संसदेचे अधिवेशन सुरू झाले आणि संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचा मित्र पक्ष आणि “इंडी” आघाडीतल्या घटक पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघमच्या सेंथिल कुमार नावाच्या खासदाराने लोकसभेत सनातन धर्माच्या नावाने शिव्या दिल्या.

    भाजपच्या विजयाची जळजळ व्यक्त करताना सेंथिल कुमार यांनी भाजप फक्त “गोमूत्राच्या राज्यात” जिंकतो. दक्षिणेच्या राज्यात जिंकत नाही. दक्षिणेकडे येण्याची भाजपची क्षमता नाही. कारण आम्ही तेलंगणा, आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये मजबूत आहोत, असे वक्तव्य केले. हिंदी पट्ट्यातील म्हणजे गाय पट्ट्यातील राज्यांमध्ये भाजप जिंकण्याची ही जळजळ होती आणि ती जळजळ अत्यंत असभ्य भाषेत सनातन धर्मियांना खटकेल, अशा भाषेत सेंथिल कुमार यांनी व्यक्त केली.

    सेंथिल कुमार यांचे बॉस तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचे पुत्र उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माला काहीच महिन्यांपूर्वी डेंगी, मलेरिया, कोरोना असे संबोधून त्याचा नायनाट करण्याची भाषा केली होती. त्याचे पडसाद देशभर उमटले होते आणि सगळीकडून संताप उसळला होता. त्याचा फार मोठा परिणाम मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड इतकेच काय तर तेलंगणाच्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील झाला. कारण प्रत्येक ठिकाणी भाजपने आपले यश दुप्पट केले. त्यापैकी 3 राज्यांमध्ये सत्ता मिळवली, तर तेलंगणामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला. तेलंगणात भाजपला सत्ता मिळाली नाही, हे खरे. तिथे काँग्रेसला सत्ता मिळाली हेही खरे, पण तेलंगणातली सत्ता काँग्रेसने भारत राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षाचा पराभव करून मिळवली, ही वस्तुस्थिती मात्र सेंथिल कुमार विसरले आणि आपल्या बॉसला म्हणजे एम. के. स्टालिन यांना खुश करण्यासाठी हिंदी पट्ट्यातल्या राज्यांचा “गोमूत्र प्रदेश” म्हणून अपमान केला. हेच नेमके काँग्रेस आणि त्याच्या मित्र पक्षांचे “हम नही सुधरेंगे” हे धोरण आहे!!

    अर्थातच सेंथिल कुमार विरुद्ध देखील देशात प्रचंड संताप उसळला आणि कालच्या निवडणुकीत अर्धेच तोंड फुटले उरलेले तोंड लवकरच जनता फोडेल, अशा प्रतिक्रिया उमटल्या.

    तरी देखील काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष सुधारण्याची सुताराम शक्यता नाही कारण नजीकच्या इतिहासाचा तसा दाखला नाही.

    मग या सगळ्या कहाणीचा वर दिलेल्या शीर्षकाशी काय संबंध??, असा प्रश्न कोणाला पडला तर तो योग्यच आहे. तो गैर मानण्याचे कारण नाही.

    तर या प्रश्नाचे उत्तर असेल की सनातन धर्माला शिव्या देऊन काँग्रेस सह सर्व विरोधक भाजपची खरंच “काँग्रेस” करण्याच्या कामाला लागले आहेत. आता भाजपची “काँग्रेस” करणे म्हणजे नेमके काय??, हे नीट समजून घेतले पाहिजे. यात भाजपची “काँग्रेस” होणे म्हणजे “जुनी काँग्रेस” होणे होय!!, जिचा सध्याचा राहुल – प्रियांका आणि सोनिया गांधी परिवाराच्या काँग्रेसशी काहीही संबंध नाही. कारण जुन्या काँग्रेसची सर्वसमावेशकता, सर्व समाज घटकांना बांधून ठेवून एकत्रितरित्या धीम्या गतीने पुढे जाण्याची क्षमता गांधी परिवाराच्या काँग्रेसने गमावली आहे. गांधी परिवाराच्या काँग्रेसने काँग्रेसचा मूळ “डीएनए”च गमावला आहे.

    काँग्रेस सर्वसमावेशकता गमावून प्रादेशिक पक्षांच्या मूळ जातीच्या अजेंड्यावर आपले राजकारण साधू पाहत आहेत, पण त्यामुळे काँग्रेस जास्तीत जास्त संकुचित होत चालली आहे. त्यातून आपण आपलाच मूळचा सर्वसमावेशक राजकारणाचा “डीएनए” गमावतो आहे, याचे भानही गांधी परिवाराच्या काँग्रेसला उरलेले नाही.

    त्या उलट हिंदुत्वाला सर्वसमावेशक स्वरूप देऊन मूळचा काँग्रेसचा “डीएनए” आणि काँग्रेसची राजकीय क्षमता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सध्या कमावतो आहे. या देशात चारच जाती माझ्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. गरीब, युवक, महिला आणि शेतकरी. त्यांचे कल्याणच हे भाजपचे ध्येय आहे, असे वक्तव्य जेव्हा पंतप्रधान मोदी करतात, तेव्हा त्यातला सर्वसमावेशकतेचा राजकीय आणि सामाजिक आशय समजून घेतला पाहिजे. या आशयातून ते काँग्रेसच्या संकुचित राजकारणालाच छेद देतात.

    भाजप सर्वसमावेशकतेच्या दिशेने

    नरेंद्र मोदींचा भाजप अशा सर्वसमावेशक हिंदुत्वाच्या रस्त्यावर आगेकूच करतो आहे. कुठेही जातीच्या राजकारणाच्या उन्मादाला अनावश्यक पाठिंबा नाही, पण सनातन धर्माचा किंवा कोणत्याही धर्माचा अपमानही सहन करणार नाही, हा स्पष्ट संदेश स्वतः मोदी आणि त्यांचे जबाबदार अनुयायी नेते प्रत्येक वेळी देत असतात. तो केवळ शब्दातून देतात असे नाही, तर कृतीतूनही देतात. राम मंदिराचे बांधकाम हे त्याचे उदाहरण आहे. त्या पाठोपाठ काशी विश्वनाथ मंदिर आणि मथुरेची कृष्ण जन्मभूमी हे दोन्ही विषय अत्यंत गांभीर्याने दमदार पावले टाकत सोडविण्याकडे भाजपचा कल आहे. ते करताना कुठेही सामाजिक स्वास्थ्य बिघडेल, एखाद्या समाजाचे अनावश्यक तुष्टीकरण करावे लागेल अथवा दुसऱ्या समाजाला दुखवावे लागेल, असले कुठलेही राजकीय वर्तन भाजपचे जबाबदार नेतृत्व करत नाही. (भाजपच्या खालच्या फळीतल्या नेत्यांना हे विधान लागू होईलच असे नाही.)

    भाजप आज घेतलेली असलेली ही सर्वसमावेशकतेची राजकीय भूमिका मूळात काँग्रेसची आहे, ती लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या काँग्रेसची आहे. त्यावेळची काँग्रेसची सामाजिक वीण आणि राजकीय भूमिका बघितली, तर ही बाब अधोरेखित होईल. टिळक किंवा गांधींनी कधीच हिंदू धर्मीयांच्या सनातन धर्मीयांच्या किंवा बाकी कुठल्याही धर्मीयांच्या भावना दुखावणारी अनावश्यक वक्तव्य केल्याचा इतिहास नाही. महात्मा गांधींवर तुष्टीकरणाचा आरोप होत असला, तरी गांधीजी वैयक्तिक जीवनात तर सनातन धर्माचे कट्टर अनुयायी होते, ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसच्या राजकारणात डाव्यांपासून उजव्यांपर्यंत वेगवेगळे प्रवाह सुरुवातीपासून होते आणि ते टिळक – गांधी – नेहरू ते इंदिरा गांधी या नेतृत्वाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कायम राहिले होते. काँग्रेसचे त्यावेळचे राजकीय यश देशव्यापी होते. देशाच्या कानाकोपऱ्यात, गावागावात आणि शहरा शहरांमध्ये काँग्रेस होती.

    काँग्रेसमध्ये राजकीय फाटाफूट अनेक वेळा झाली, तरी काँग्रेसचा सर्वसमावेशकत्वाचा मूळ “डीएनए” फारसा हलला नव्हता. अगदी इंदिरा गांधींनी देखील कम्युनिस्टांचा आर्थिक मार्ग स्वीकारल्यानंतर सुद्धा सामाजिक दृष्ट्या अथवा राजकीय दृष्ट्या त्या कम्युनिस्टांच्या कच्छपी लागल्या नव्हत्या.

    उलट 1980 च्या दशकात इंदिरा गांधी आणि संघ यांच्यात “पॉलिटिकल पॅचअप” झाल्याचे उदाहरण दिसते. हे करताना दोन्हीही संघटनांनी म्हणजे इंदिरा गांधींची काँग्रेस आणि संघ यांनी आपापली धोरणे आणि तत्वे बिलकुल बदलल्याचा इतिहास नाही. पण राजकीय प्रगल्भता दाखवत आपल्याला “उजवे राजकारण” करावे लागेल, याची जाणीव इंदिरा गांधींना झाली होती आणि इंदिरा गांधींमध्ये त्यावेळचा संघ परिवार एक कणखर हिंदू नेता म्हणून पाहात होता. कारण त्यावेळी संघाला अपेक्षित असलेला राजकीय पक्ष म्हणून जनसंघ किंवा भाजप तेवढा प्रबळ नव्हता.

    भाजपची नवी वाटचाल

    आज भाजपने आपले राजकीय स्थान प्रबळ तर केले आहेच, पण भारतीय राजकारणाची मूळ सर्वसमावेशी भूमिका, जी टिळकांच्या काळात आणि महात्मा गांधींच्या काळात काँग्रेसने स्वीकारली होती, ती राजकीय भूमिका भाजपने आत्मसात केली आहे. भाजपचे यश देशव्यापी होत चालले आहे 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच देशातल्या 52% लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आली आहे. या अर्थाने आत्ता भाजपची “काँग्रेसीकरणाकडे” वाटचाल सुरू आहे. त्यासाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न तर सुरू आहेतच, पण काँग्रेस आणि विरोधक देखील सनातन धर्माला आणि भारतातल्या बहुसंख्यांक हिंदूंना शिव्या देऊन भाजपच्या “काँग्रेसीकरणाला” म्हणजेच सर्वसामावेशीकरणाला स्वतःचा मोठा हातभार लावत आहेत, ही आजची राजकीय वस्तुस्थिती आहे. सेंथिल कुमार यांच्या वक्तव्यातून ही वस्तुस्थिती कालच पुन्हा अधोरेखित झाली.

    भाजपच्या काँग्रेसीकरणाला विरोधकांचा हातभार

    काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांच्या राजकीय अपरिपक्पतेतून भाजपची सर्वसमावेशक हिंदुत्वाची भूमिका तर बळकट होईलच, पण संपूर्ण देशातल्या जनतेत काँग्रेस आणि मित्र पक्षांवरचा संताप वाढून त्याचे रूपांतर भाजपच्या देशव्यापी राजकीय यशात होईल. तो पक्ष उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जनमताचा मोठा पाठिंबा मिळेल. भाजप जुन्या काँग्रेसची जागा घेईल. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हे चित्र पूर्ण होताना दिसेल. भाजपला असे देशव्यापी राजकीय यश मिळवून देण्यात हातभार लावून त्या पक्षाचे “काँग्रेसीकरण” करण्यात गांधी परिवाराची काँग्रेस आणि विरोधक आपापल्या परीने “योगदान” देतील!!… सनातन धर्माला शिव्या देऊन आपलेच खड्डे ते आपल्या हाताने खोदून आपल्याला त्यात लोटून घेतील!!

    By abusing sanatan dharma Congress and opposition leaders are assuring BJP’s a nationwide landslide victory and making BJP like an old nationwide Congress party!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य