वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Ram Navami रविवारी देशभरात रामनवमी साजरी करण्यात आली. देशातील प्रमुख राम मंदिरांमध्ये सकाळपासून ते रात्रीपर्यंत भाविकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिर सुंदरपणे सजवण्यात आले होते आणि रोषणाई देखील करण्यात आली होती. सूर्याच्या किरणांनी भगवान श्रीरामांचा तिलक केला. रात्री लोकांनी शरयू नदीच्या काठावर हजारो दिवे लावले.Ram Navami
उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, पश्चिम बंगाल, झारखंड येथे रामनवमीनिमित्त मिरवणुका काढण्यात आल्या. या सर्व राज्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले होते. हजारो पोलिस आणि इतर सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते.
महाराष्ट्रातील रायगड येथे भगवान श्रीराम यांच्या ३० फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मुंबईत ११ हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसने सुमारे २५०० मिरवणुका काढल्या होत्या. राज्यात ६ हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. ड्रोन आणि सीसीटीव्हीद्वारे पाळत ठेवण्यात आली.
जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमधील लाल चौकात रामनवमीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे, मुस्लिम समुदायाने रामनवमीच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांना सरबत वाटले.
महाराष्ट्रातील नागपूरमध्ये मुस्लिम सेवा समितीच्या सदस्यांनी मिरवणुकीवर पृष्पवृष्टी केली. समितीच्या एका सदस्याने सांगितले की, आम्ही १९९३ पासून ही परंपरा पाळत आहोत. त्याचा संदेश बंधुत्वाचा आहे. मिलाद-उन-नबी दरम्यान हिंदू बांधवही उत्साहाने आमचे स्वागत करतात.