वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीत सोमवारी वादळी पावसाने आपले रौद्र रूप दाखविले. ताशी 100 किलोमीटर वेगाने वाळलेल्या वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झाले. दिल्लीतील जामा मशिदीच्या मुख्य घुमटावरील तब्बल 300 किलो वजन असलेला मुख्य कळस या प्रचंड वेगवान वाऱ्यामुळे कोसळला. 100-kilometer-high wind blew the summit of the main dome of the Jama Masjid
आज मंगळवारीही दिल्लीत पावसाचा प्रभाव दिसून येत आहे. काल झालेल्या पावसामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली आहेत. तर, दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
मध्य दिल्लीतील जामा मशीदीसह परिसरातील इतर वास्तूचेही नुकसान झाले आहे. तर, शहरातील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर, घराच्या गच्चीचा भाग अंगावर कोसळल्याने एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. अंगूरी बाग परिसरात पिंपळाचे झाड अंगावर पडल्याने बशीर बाबा नावाच्या ६५ वर्षीय व्यक्तीला प्राण गमवावे लागले. दिल्लीत सोमवारी सायंकाळी ताशी १०० किलोमीटर वेगाने वारे वाहिल्याची नोंद झाली.
जामा मशिदीच्या मुख्य घुमटावरील कळस कोसळल्याचे मशिदीचे शाही इमाम सैयद अहमद बुखारी यांनी सांगितले. या कळसाचे वजन जवळपास ३०० किलो आहे. पण निसर्गाच्या भयानक रौद्र रूपाने हा कळस कोसळला. मशिदीच्या मीनारांचेही नुकसान झाले. मुख्य घुमटावर पुन्हा कळस बसवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. मशिदीचे नुकसान झाल्यानंतर दिल्लीतील वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी एक पथक पाहणीसाठी पाठवले आहे. मशिदीचे नुकसान पाहता तातडीने दुरुस्तीसाठी पंतप्रधानांना पत्र पाठणार असल्याचेही शाही इमामांनी म्हटले आहे.
दिल्लीत सोमवारी रात्री झालेल्या वादळी पावसाचा विमानांना फटका बसला आहे. कमीत कमी ४० विमानांनी उशीराने उड्डाण केलं. हवामान विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीत संध्याकाळी साडे पाचपर्यंत १७.८ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.