वृत्तसंस्था
मुंबई : होळीनंतर राज्यात तापमान वाढीस सुरुवात झाली. त्यानंतर काही दिवस राज्यात कमी अधिक पाऊस पडला. आता अकाश निरभ्र झाले असून तापमान पुन्हा वाढू लागले आहे. राज्यात तीन ते चार दिवसांत कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा उन्हाच्या तीव्र झळा जाणवणार आहेत. पारा चाळिशीत जाण्याची शक्यता आहे. will feel the intense heat of summer; The mercury will go up to 40 degrees
कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे राज्याच्या बहुतांश भागात गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण आणि पावसाळी स्थिती होती. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली. काही भागांत गारपीटही झाली. या कालावधीत कमाल तापमानात घट झाल्याने उन्हाच्या झळा कमी झाल्या होत्या. मात्र दोन दिवसांपासून पुन्हा कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाची स्थिती निर्माण झाली आहे. तापमानात वाढ सुरू झाली आहे.
बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या पुढे जात आहे. काही भागांत संध्याकाळनंतर आकाश अंशत: ढगाळ होत असल्याने तापमानात वाढ होऊन रात्रीचा उकाडा वाढत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील कमाल तापमानात तीन ते चार दिवसांत २ ते ३ अंशांनी वाढ होईल तापमानाचा पारा चाळिशीत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या मध्य प्रदेश ते कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा मराठवाडामार्गे गेला आहे. सध्या दक्षिणेकडील काही राज्यांत पावसाळी वातावरण आहे. त्याचा परिणाम म्हणून विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
ब्रह्मपुरी ४३ अंशांवर
विदर्भात कमाल तापमान ४० अंशांदरम्यान आहे. ब्रह्मपुरी येथे सोमवारी उच्चांकी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रविवारीही ४३ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. ते देशातील उच्चांकी तापमान ठरले.