विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात महाराष्ट्राच्या शिवसेना आणि भाजप या 25 वर्षांच्या मित्र पक्षांमध्ये जोरदार राजकीय घमासान सुरू आहे. एकीकडे हे घमासान सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस मात्र या दोन पक्षांना आपले “काम” दाखवताना दिसते आहे.Sweating in Shiv Sena-BJP; Nationalist show work in the middle !!
दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नवी मुंबईला भेट दिली. या भेटीत त्यांनी भाजपचे 8 नगरसेवक गळाला लावण्याचे काम केल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि सध्या भाजपमध्ये असलेले नवी मुंबईचे प्रबळ नेते गणेश नाईक यांचे दोन समर्थक नेते रवींद्र इथापे आणि प्रदीप गवस यांनी कालच शरद पवार यांची राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मध्यस्थीतून भेट घेतली आणि त्यांच्याकडे भाजपमधून राष्ट्रवादीत येऊ शकणाऱ्या 8 नगरसेवकांची यादी सोपवली. शरद पवार यांनी त्यांना आपल्या निर्णयाची वाट पाहण्यास सांगितले आहे.
एकीकडे नवी मुंबईत भाजप फोडण्याची राष्ट्रवादीची तयारी चालू असताना दुसरीकडे पिंपरी-चिंचवड मध्ये देखील भाजपला खिंडार पाडण्याचा राष्ट्रवादीचा डाव दिसून येत आहे. मोशी जाधववाडी प्रभागाचे भाजपचे विद्यमान नगरसेवक वसंत बोराटे यांनी राजीनामा दिला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे हे गेल्या पाच वर्षांपासून त्यांना पदासाठी नुसते झुलवत होते, अशीही चर्चा आहे. त्यामुळे आपला स्वाभिमान दुखावला गेला आणि म्हणून आपण भाजपच्या नगरसेवकपदाचा राजीनामा देत आहोत, असे सांगत वसंत बोराटे यांनी महापालिका सोडली आहे. लवकरच ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
याचा अर्थ संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजप हे दोन महाराष्ट्रातले प्रबळ पक्ष एकमेकांचे गळे धरत असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र शांतपणे आपल्या पक्षाचे “राजकीय भांडवल” वाढवताना दिसत आहेत. दस्तुरखुद्द शरद पवारांनी यात लक्ष घातल्याने भाजपला मोठे खिंडार पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेवर जोरदार तोफा डागताना भाजपचे नेते आपला पक्ष राष्ट्रवादी पासून वाचविण्यासाठी नेमके काय करतात? हे पाहणेही महत्त्वाचे आहे.