वृत्तसंस्था
मुंबई : हिंदूंचा पवित्र महिना श्रावण सोमवारपासून (ता.९ ) सुरुवात होत आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा/सणांचा राजा म्हटले जाते. श्रावणातील प्रत्येक वारी देवदेवतांची पूजा वा व्रत करण्याची हिंदू आणि जैनधर्मीयांची परंपरा आहे. शंकराच्या उपासनेला तर हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. ‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे,..’ या बालकवी अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या कवितेने तर श्रावण मासाची महती अधिकच वाढविली आहे. Shravan, the holy month of Hindus, from 9th August
आषाढ अमावास्येनंतर श्रावणास सुरुवात होते. यंदा सोमवारपासून (ता. ९) श्रावण महिना सुरु होतो. श्रावण महिना पूर्वी ‘नभस्’ या नावाने ओळखला जात असे. या महिन्यात रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला श्रवण नक्षत्र उगवते आणि रात्रभर आकाशात राहून पहाटे पश्चिमेस मावळते. तसेच श्रावण पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रापाशी असतो. म्हणून या महिन्याला ‘श्रावण’ असे नाव मिळाले आहे. महाराष्ट्रात सोमवार, ९ ऑगस्ट २०२१ ते सोमवार ते ६ सप्टेंबर २०२१ या कालावधीत श्रावण मास साजरा होत आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व असून प्रत्येक दिवशी वेगवेगळी व्रते आचरली जातात.
श्रावणी सोमवार : श्रावणातील प्रत्येक सोमवारला महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. यंदाच्या वर्षी ९ ऑगस्ट, १६ ऑगस्ट, २३ ऑगस्ट, ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर रोजी श्रावणी सोमवार आहे. महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक केला जातो. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामूठीचे महत्त्वही वेगळे आहे.
श्रावणी मंगळवार/मंग गौर : श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत केले जाते. नवविवाहित महिला लग्नानंतर पहिली पाच वर्षे हे व्रत करतात.
नवविवाहित महिला सकाळी एकत्रित पूजा करतात. त्यानंतर रात्री जागरणाच्या वेळी, विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे.
श्रावणी बुधवार : श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते. या व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन घरोघरी पूजा केली जाते. हे व्रत सात वर्षे केले जाते. धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्याधन देण्याचा त्यांचा लौकिक आहे,
श्रावणी शुक्रवार/जिवतीची पूजा : श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. लहान मुलांचे रक्षण करणारी, त्यांना उदंड आयुष्य चिंतणार आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याची इच्छा व्यक्त करणार हे व्रत आहे. जीवंतिका व्रत हे असेच भावना जपणारे आणि नाजूक नात्याचे पावित्र्य सांगणारे व्रत. संतती रक्षणार्थ मानली जाते.
श्रावणी शनिवार/अश्वस्थ-मारुती, नृसिंह पूजन : श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. पिंपळाची पूजा म्हणजे विष्णूपूजा करणे, असे मानले जाते. पिंपळाखाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. श्रावणातील सर्व शनिवारी एका खांबावर अथवा भिंतीवर नृसिंहाचे चित्र काढून त्याचे पूजन केले जाते.
श्रावणी रविवार / आदित्य राणूबाई व्रत : श्रावणाच्या केवळ पहिल्या रविवारी आदित्य राणूबाई व्रत करण्याची प्रथा आहे. हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे. खानदेशातील बऱ्याच घरांमध्ये कुठल्याही मंगलकार्याच्या आधी राणूबाई आणि सूर्याचे लग्न लावण्याची रीत आहे. सूर्यपूजा करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत आहे. त्यापैकीच ही एक प्रथा आहे.
नागपंचमी : श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी आहे. यंदा शुक्रवारी ( ता. १३) नागपंचमी असून नागदेवतेची पूजा केली जाते.
नारळी पौर्णिमा / राखी पौर्णिमा : तसेच श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यंदा रविवारी (ता.२२) नारळी पौर्णिमा तसेच रक्षाबंधन आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमी : श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून हा दिवस कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी सोमवारी (ता. ३०) श्रीकृष्ण जयंती आहे. याला गोकुळाष्टमी असेही म्हटले जाते. या दिवशी दहीहंडी फोडून काला करण्याची परंपरा आहे.
बैलपोळा : तसेच श्रावण अमावास्येला पोळा किंवा बैलपोळा साजरा केला जातो. यंदा शुक्रवारी (ता. ६ ) श्रावण अमावास्या आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे. याशिवाय श्रावण शुद्ध एकादशी पुत्रदा एकादशी, तर श्रावण वद्य एकादशी अजा एकादशी म्हणून साजरी केली जाते.
Shravan, the holy month of Hindus, from 9th August
महत्त्वाच्या बातम्या
- चीनने एकाच दिवसात दिले १ कोटी ८० लाख कोरोना लसीचे डोस, आत्तापर्यंत नागरिकांना दिले १६३.७ कोटी डोस
- आरेला कारेनेच उत्तर देऊ, पण शिवसेना भवन फोडण्याबाबत वक्तव्य केले नाही, आमदार प्रसाद लाड यांनी केले स्पष्ट
- चित्रपटात भूमिका देण्यासाठी अभिनेत्रीकडे केली शरीरसुखाची मागणी, मनसेच्या कार्यकर्त्यांनी आरोपींना दिला चोप
- Tokyo Olympics : वंदनाच्या हॅटट्रिकने केली कमाल, 41 वर्षांनी हॉकी संघ ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत, आता लढत ऑस्ट्रेलियाशी