विनायक ढेरे
शिंदे फडणवीस सरकारच्या बाबतीत सूत्रांची माहिती, मंत्र्यांचे आकडे, मंत्रिमंडळाचा विस्तार आणि माध्यमांचा बौद्धिक दिवाळखोरी चमत्कार!! अशीच खरोखरच स्थिती आहे!! Shinde Fadanavis ministry expansion : no media knows the real story, as their sources are so weak in BJP
महाराष्ट्रात शिवसेना फुटून एवढे मोठे बंड झाले. एकनाथ शिंदे गटाचे 40 आमदार सुरत, गुवाहाटी, गोवा असा प्रवास करून मुंबईत आले. या सगळ्याच्या बातम्या प्रसार माध्यमांनी दिल्या. पण एकालाही देवेंद्र फडणवीस नव्हे, तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार आहेत हे शेवटच्या क्षणापर्यंत माहिती नव्हते!! तशा बातम्या कोणी देत नव्हते. शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या बातम्या हवेतल्याच होत्या. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राजभवनात राज्यपालांना भेटत असताना देखील देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार, असे सूत्रांच्या हवाल्याने सगळी प्रसार माध्यमे छातीठोकपणे सांगत होती. पण अखेरीस घडले उलटे. माध्यमांची सगळी सूत्रे उलटी पालटी पडली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले!! प्रसार माध्यमे तोंडावर पडली!!
पण एवढे झाले तरी प्रसार माध्यमांचे हवाले अजूनही त्याच जुन्या घिश्या-पिट्या सूत्रांवरच आहेत. त्याच सूत्रांच्या हवाल्याने विविध माध्यमे शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या नवनव्या तारखा जाहीर करत आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील नावे परस्पर जाहीर करत आहेत. त्यांचे खाते वाटपही परस्पर केले आहे आणि मंत्र्यांचे आकडेही कधी 5 कधी 10 कधी 12 असे जाहीर करत आहेत.
मंत्रिमंडळाचा विस्तार फक्त 5 नेत्यांना माहिती
मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होणार हे स्वतः एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे तीन वरिष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या खेरीज कोणालाही माहिती नाही. यापैकी कोणीही अधिकृत माहिती कुठल्याही माध्यमांना देत नाही आणि माध्यमांच्या सूत्रांची पोहोच या पाचही नेत्यांपर्यंत नाही. त्यामुळे लटकलेली सूत्रे आणि लटकलेली माध्यमे अशीच खरी म्हणजे स्थिती आहे आणि याच लटकलेल्या सूत्रांच्या हवाल्याने मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या मंत्र्यांचे आकडे त्यांचे खातेवाटप शिंदे गटाला किती भाजपला किती त्याचे त्रैराशिक प्रसार माध्यमे मांडत आहेत!! कोणी म्हणते भाजपच्या वाट्याला 29 मंत्रिपदे येणार कोणी म्हणते 27 मंत्री येणार कोणी म्हणते एकनाथ शिंदे यांचा गट मंत्री जास्त मंत्री पदाची मागणी करतोय म्हणून मंत्रिमंडळ विस्तार अडला आहे. कोणी म्हणते राष्ट्रपती पदाची निवडणूक झाल्यावर दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि 12 मंत्री शपथ घेतील. परंतु, परंतु एकाही माध्यमाला यातली खरी बातमी, मंत्र्यांचा खरा आकडा आणि खरी तारीख माहिती नाही. तरी देखील मंत्रिमंडळ विस्ताराचा मराठी माध्यमे दररोज स्वतःच खेळ खेळत आहेत.
– खरे कोणत्याच सूत्रांना माहिती नाही
एक मात्र बरे शिंदे फडणवीस सरकार स्थापन होण्यापूर्वीचा सगळा खेळ “हा रात्रीस खेळ चाले”च्या धरतीवर चालायचा. बहुतांश घडामोडी रात्रीच्या अंधारातच व्हायच्या. सरकार मात्र सायंकाळी स्थापन झाले. सरकारचा कारभार दिवसाढवळ्या सुरू आहे. ठाकरे पवार सरकारचे निर्णय दिवसाढवळ्या फिरवले जात आहेत. परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होणार यातली खरी बातमी मात्र माध्यमांना ना दिवसाच्या सूत्रांकडून समजते आहे, ना रात्रीच्या सूत्रांकडून… ही 16 जुलै 2022 ची वस्तुस्थिती आहे!!
Shinde Fadanavis ministry expansion : no media knows the real story, as their sources are so weak in BJP
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील 8000 सहकारी संस्थांच्या निवडणुका ढकलल्या पुढे!
- आरे कारशेड मुद्द्यावर आदित्य ठाकरे आम आदमी पार्टीच्या टार्गेटवर; ठाकरे सरकारने मुंबईला बनवले मूर्ख!!
- नामांतर ते आरक्षण : ठाकरे गट – राष्ट्रवादीचे सकाळ – दुपारचे आरोप संध्याकाळी शिंदे फडणवीसांकडून खारीज!!
- शिंदे – फडणवीस लागलेत आपापल्या प्रचाराला; सुप्रियाताई – अजितदादा लावतायेत त्यांच्यात कलगीतुरा!!