विशेष प्रतिनिधी
मुंबई : कसब्यातल्या सुतावरून दिसला सत्तेचा स्वर्ग, पवार – ठाकरे {(ठाकरे – पवार नव्हेत)} झालेत स्वप्नात गर्क!!, असे सध्या खरंच घडते आहे. कसबा पेठेतील पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवामुळे महाविकास आघाडीचे नेते एवढे सुखावले आहेत, की त्यांना कसब्यातल्या विजयी सुतावरून महाराष्ट्रातल्या सत्तेचा स्वर्ग दिसू लागला आहे!! Sharad Pawar, ajit Pawar, Uddhav Thackeray’s day dreaming of MVA power after defeating BJP in kasba byelections
शरद पवार, उद्धव ठाकरे, अजितदादांपासून अगदी विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यापर्यंत सगळ्यांनाच महाराष्ट्रातल्या सत्तेचा स्वर्ग दोन बोटे उरला आहे!! कारण कसब्यातल्या भाजपच्या पराभवाने या सर्व नेत्यांनी इतके मोठे निष्कर्ष काढले आहेत, की कसब्यातून संपूर्ण देशात बदलाची लाट उसळल्याचे त्यांना दिसले आहे. देशात बदल घडणार असा त्यांचा (अति)आत्मविश्वास जागा झाला आहे!!
पवारांची चतुराई
तीन राज्यांमधील भाजपचा विजय, चिंचवडमध्ये भाजपने राष्ट्रवादीचा केलेला पराभव याकडे चतुराईने डोळेझाक करत शरद पवारांनी गेले दोन – तीन दिवस कसब्यातला भाजपचा पराभव हा विषय सातत्याने मराठी माध्यमांमध्ये लावून धरला आहे. विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी देखील याच विषयाला अनुषंगाने मुलाखती देऊन महाराष्ट्रात भाजपचे 40 ते 45 आमदार पुन्हा काँग्रेस अथवा राष्ट्रवादी या त्यांच्यात मूळ पक्षात घरवापसी करणार असल्याचा दावा केला आहे.
आमदारांच्या घरवापसीवर राष्ट्रवादीचा डोळा
2014 आणि 2019 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जे नेते सोडून गेले, ते भाजपच्या तिकिटावर आमदार झाले. त्यावेळी मोदी लाट आणि भाजपच्या बाजूचे वातावरण त्यांना उपयोगी ठरले. पण झालेल्या चुका समजून घेऊन हे आमदार परत घर वापसी करतील, असा अजितदादांचा दावा आहे.
ठाकरे गटाचे टार्गेट फक्त 40 आमदार!!
उद्धव ठाकरे हे स्व पक्षातल्याच जुन्या नेत्यांशी झुंजण्यात मग्न आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीचे टार्गेटच निश्चित करून टाकले आहे. शिंदे गटाच्या 40 च्या 40 आमदारांचे डिपॉझिट जप्त करणे हे त्यांचे टार्गेट आहे. याचा अर्थ महाराष्ट्रात सत्ता आणण्याशी त्यांना काही देणे घेणे नाही. महाराष्ट्रात शिंदे गटाचे आमदार पाडले आणि त्यांचे डिपॉझिट जप्त झाले की ठाकरे गटाचा राजकीय कार्यभाग साध्य झाला असेच त्यांच्या वक्तव्यातून आणि राजकीय कृतीतून स्पष्ट होते. कारण त्यांना शिंदे गटाचा पराभव हा भाजप आणि अन्य पक्षांच्या पराभवापेक्षा मोलाचा वाटतो आहे.
पण पवार काका पुतण्यांनी मात्र कसब्यातला भाजपचा पराभव हा विषय खूप मोठा करून पुण्यात आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा पाया या निमित्ताने महाराष्ट्रात मजबूत करण्याचे ठरविले आहे. मराठी माध्यमांची त्यांना उघडपणे साथ आहे.
पण पवार काका – पुतणे आणि ठाकरे हे करत असताना भाजप हातावर हात धरून गप्प बसेल असे गृहीत कसे धरता येईल??, हे प्रश्न मराठी माध्यमातून पत्रकार त्यांना विचारत नाहीत आणि त्यामुळे ते त्याची उत्तरे देत नाहीत.
राष्ट्रवादी – काँग्रेसकडे द्यायला आहे काय??
त्याही पलिकडे जाऊन एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बंडखोरांना सत्तेचा वाटा देण्यासाठी भाजपच्या हातात मूळात सत्ता होती. अन्य बऱ्याच गोष्टी होत्या. आता याच 40 – 45 आमदारांची काँग्रेस अथवा राष्ट्रवादीमध्ये घर वापसी करायची असेल तर त्यांना देण्यासारखे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या हातात काय शिल्लक आहे?? कोणती सत्तेची आमिषे दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे नेते या आमदारांना आपल्या पक्षात खेचू शकणार आहेत?? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
राष्ट्रवादीत मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तीव्र
राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या गेल्या 25 वर्षांच्या राजकीय वाटचालीत एकदाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळवता आलेले नाही. त्यांची मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा मात्र पोस्टरवर जोरात रंगली आहे. या संदर्भात राष्ट्रवादीतला कोणताच नेता ठामपणे उत्तर देऊ शकत नाही. अजितदादांना देखील या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्र्याचे काय असेल ते नंतर ठरवू. जो 145 आमदार निवडून आणण्याची क्षमता राखतो, तो मुख्यमंत्री होईल असे सरधोपट उत्तर दिले. पण जिथे राष्ट्रवादी सारख्या पक्षात मुख्यमंत्री कोण यावरच संघर्ष असल्यामुळे थेट उत्तर देता येत नाही, त्या राष्ट्रवादीत भाजपचे आमदार घरवापसी करू शकतील हे स्वप्नरंजन केवळ कसब्याच्या बळावर करणे आणि त्या सुतावरून महाराष्ट्रातल्या सत्तेचा स्वर्ग गाठणे राजकीय दृष्ट्या कितपत व्यवहार ठरेल??, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
स्वप्न बघायला पैसे पडत नाहीत
पण स्वप्न पाहायला पैसे पडत नाहीत तसेच कसब्याच्या सुतावरून स्वर्ग गाठायला आगामी वर्ष, दीड वर्षे तरी काही धोका नाही. जेव्हा प्रत्यक्ष निवडणुका येतील, लढायची वेळ येईल, उमेदवार मैदानात उतरवायची वेळ येईल, तेव्हा काय होईल??, हा भाग वेगळा!! तोपर्यंत कसब्याच्या सुतावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विशेषतः पवार आणि ठाकरे यांनी सत्तेचा स्वर्ग गाठायला कुणाची काहीच हरकत असायची गरज नाही!!
Sharad Pawar, ajit Pawar, Uddhav Thackeray’s day dreaming of MVA power after defeating BJP in kasba byelections
महत्वाच्या बातम्या