- पवार मार्गदर्शित राष्ट्रीय विरोधी ऐक्य वाहून गेले??
विशेष प्रतिनिधी
अजितदादांच्या कथित बंडाच्या चर्चेत शरद पवार मार्गदर्शित राष्ट्रीय विरोधी ऐक्य वाहून गेले का??, हा सवाल आता तयार झाला आहे. कारण अजितदादा नॉटरिचेबल ते अजितदादांचे बंड या बातम्या मराठी प्रसार माध्यमांमध्ये झळकण्यापूर्वी राष्ट्रीय विरोधी ऐक्याचा विषय प्रसार माध्यमांनी ऐरणीवर आणला होता, तो माध्यमांमधून पूर्ण गायब झाला आहे. Sharad Pawar again in trap of suspicious move of opposition unity due to ajit Pawar’s rebellion
त्याआधी सावरकर मुद्द्यावर राहुल गांधींनी जो “एवंगुणविशिष्ट” गोंधळ घालून ठेवला होता, तो सावरताना विरोधकांना नाकीनऊ आले होते. शेवटी स्वतः शरद पवारांना मध्यस्थ व्हावे लागले आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी 18 पक्षांच्या बैठकीत राहुल गांधींना सावरकर मुद्द्यावर बॅकफूटवर ढकलावे लागले होते. पवारांची भूमिका त्या बैठकीत एकदम महत्त्वाची ठरली होती. पवारांनी सांगितले आणि सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांना ऐकावे लागले, अशी स्थिती निदान त्या बैठकीपुरती आणि नंतर काही दिवस झाली होती.
पण अचानक अजितदादा नॉटरिचेबल झाले. अजितदादांचे बंड या बातम्या सुरू झाल्या आणि सगळे “राष्ट्रीय वारे” “महाराष्ट्रीय वाऱ्यात” रूपांतरित होऊन फिरले आणि राष्ट्रीय विरोधी ऐक्याचे राहूच द्या, त्याऐवजी पवारांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादीच अखंड टिकते की नाही?? या विषयीची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली.
पण त्या बातम्याही तीन-चार दिवस “एन्जॉय” केल्यानंतर स्वतः शरद पवार, अजित दादा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एक सुरात खुलासे केले. यातला अजितदादांचा खुलासा असा होता की त्या खुलाशालाही नंतर “स्वयंस्फूर्त” फाटे फुटले. त्यामुळे अजितदादांचे बंड महाराष्ट्रातील राजकीय हवेत अनुक्रमे “राजकीय वादळ”, “राजकीय ढगाळ वातावरण” ते “राजकीय कुंद वातावरण” असे रूपांतरित होत राहिले. ते अजून कायम आहे!!
पण या वादळी, ढगाळ, कुंद महाराष्ट्रीय राजकीय वातावरणात राष्ट्रीय पातळीवरचे पवार मार्गदर्शित विरोधी ऐक्य कुठल्या कोठे वाहून गेलेले दिसले..
गेल्या काही दिवसांमध्ये त्या विरोधी ऐक्याची मराठी माध्यमांमध्ये चर्चाही दिसत नाही. त्या उलट अजितदादा किती आमदारांना राष्ट्रवादीतून फोडून बाहेर घेऊन जाणार?, 40 आमदारांपैकी किती आमदार अजितदादांबरोबर टिकणार??, मग उरलेले 13 आमदार तरी शरद पवारांबरोबर राहणार का??, मग सुप्रिया सुळे यांचे राजकीय भवितव्य काय राहील?? इथपासून ते शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना स्वतः फोनाफोनी करून अजितदादांचे बंड रोखले. त्यात ते यशस्वी झाले, वगैरे बातम्यांचा रतीब मराठी माध्यमांनी घातला. अजितदादांना बॅकफूटवर का यावे लागले??, याविषयी पवार प्रणित मराठी माध्यमांनी चर्चांचा रतीब घातला.
पण या सगळ्या चर्चांमधून पवार मार्गदर्शित राष्ट्रीय विरोधी ऐक्य जे गायब झाले, ते कायमचेच असे म्हणायची पाळी आली. कारण ज्या राष्ट्रीय विरोधी ऐक्यासाठी शरद पवार हे मुख्य मार्गदर्शक म्हणून देशपातळीवरची भीष्मपितामहाची भूमिका बजावत होते, त्यांना एकदम स्वपक्ष वाचविण्यासाठी स्वतः अर्जुनाच्या भूमिकेत खाली यावे लागले आणि इथेच हे “सत्य” सांगताना पवार प्रणित मराठी माध्यमांची गोची झाली!!
जे पवार 18 पक्षांच्या बैठकीत राहुल गांधींना सावरकर मुद्द्यावर बॅकफूटवर ढकलू शकले, त्यामुळे त्यांचे राष्ट्रीय पातळीवरचे महत्त्व विशेषत्वाने वाढले होते. भले त्यांना पंतप्रधानपद कोणी ऑफर केले नसेल, पण त्यांचे राष्ट्रीय पातळीवरचे “मार्गदर्शक पद” तर निश्चित झालेच होते. त्याच “मार्गदर्शक पदा”ला नेमका अजितदादांच्या कथित बंडाने खोडा घातला आणि पवारांना स्व पक्ष म्हणजे राष्ट्रवादी टिकवून ठेवण्यासाठी खाली यावे लागले.
जे शरद पवार राष्ट्रीय विरोधी ऐक्य साधून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी टक्कर घ्यायला निघाले होते, त्या पवारांना स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी आमदारांना फोनाफोनी करावी लागली आणि निवडणूक आयोगाने दाखवून दिलेल्या “प्रादेशिक” राजकारणाच्या जाळ्यात अडकावे लागले.
पवारांभोवती संशयाचे जाळे गडद
इतकेच नाही, तर दरम्यानच्या काळात खुद्द पवारांच्याच भूमिकेविषयी विरोधकांच्या मनात संशयाचे जाळे तयार झाले. ज्यांना मोदींशी खरी टक्कर घ्यायची आहे, त्यांच्या मनात शरद पवार खरंच विरोधी ऐक्याला मनापासून साथ देतील का??, असा संशय तयार झाला आणि या संशयाच्या जाळ्यात पवार अडकले. हे सगळे अजितदादांच्या कथित बंडामुळे घडले!!
पवारांना चिकटला दुटप्पीपणाचा आरोप
आता शरद पवारांनी भले पुन्हा विरोधी ऐक्याचे प्रयत्न सुरू केले, त्यात विरोधकांना साथ देण्याचा प्रयत्न केला तरी पवार महाराष्ट्रात मोदींना मदत करणारी खेळी करतात आणि केंद्रात विरोधी ऐक्यासाठी प्रयत्न करतात, हा दुटप्पीपणाचा आरोप त्यांना चिकटणार आहे. विरोधकांच्या मनात पवारांवरचा संशय गडद होणार आहे. याचाच एकूण परिणाम विरोधी ऐक्याच्या प्रयत्नांना सुरुंग लागण्यात होणार आहे. अजितदादांच्या कथित बंडाचे महाराष्ट्रात काय व्हायचे तो होवो, मात्र ते राष्ट्रीय पातळीवर पवारांच्या विश्वासार्हतेला धक्का लावून गेले आहे!!
Sharad Pawar again in trap of suspicious move of opposition unity due to ajit Pawar’s rebellion
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीतील फूट : पवारांच्या इंग्रजी आत्मचरित्राचे टायटल आहे, “ऑन माय टर्म्स”; पण मोदी – शाह कधी इतरांच्या टर्म्सवर राजकारण करतात??
- मराठी माध्यमांनी रचला महाविकास आघाडीच्या यशाचा इमला; विनोद तावडेंनी ढासळवला त्याच्या अहवालाचा पाया!!
- ‘’…तेजस्वी यादव यांनी माफियाचे फोटो त्यांच्या कार्यालयात लावावेत’’- गिरीराज सिंह भडकले!
- राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीत अतीक अहमद हत्येवर शरद पवारांचे सूचक भाष्य; यंत्रणांनी कायदा हातात घेऊ नये!!