प्रतिनिधी
मुंबई : मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे दीर्घ आराजाने निधन झाले आहे. त्या 81 वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्यांना अल्जायमर होता. आज त्यांच्या निधनाने लाघवी अभिनयाची सीमा जगाच्या पाठीवरून निघून गेली आहे!! seema deo passed away
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रमेश देव यांचे निधन झाले. त्यानंतर दीड वर्षात सीमा देव यांनी जगाचा निरोप घेतला. राजा परांजपे दिग्दर्शित ‘जगाच्या पाठीवर’ (1961) या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘सुवासिनी’, ‘आनंद’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.
सीमा देव- रमेश देव यांची जोडी
रमेश देव आणि सीम देव यांनी मराठी चित्रपटांपेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. केवळ अभिनयानेच नाही तर आपल्या प्रेमकहाणीनेही त्यांनी चाहत्यांच्या मनात स्थान मिळवलं. सीमा देव यांचे मूळ नाव नलिनी सराफ आहे. त्यांच्या पहिल्यावहिल्या चित्रपटात रमेश देव यांनी देखील भूमिका साकारली होती. या पहिल्याच चित्रपटापासून ही जोडी सुपरहिट ठरली होती. त्यानंतर दोघांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. प्रेक्षकांना या दोघांची जोडी खूप आवडली. सीमा देव यांनी ‘सरस्वतीचंद्र’, ‘ड्रीम गर्ल’, ‘आनंद’, ‘कोशिश’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.
कलाविश्वावर शोककळा
1962 मध्ये ‘वरदक्षिणा’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि त्याच वर्षी दोघांनी विवाह केला. सीमा आणि रमेश देव यांना अजिंक्य देव आणि अभिनय देव ही दोन मुले आहेत. त्यापैकी अजिंक्यनेही आईवडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले, तर अभिनय हा दिग्दर्शन आणि पटकथा लेखन क्षेत्रात यशस्वी झाला.
सीम देव यांच्या निधनावर अभिनेते सचिन पिळगावकर यांनी शोक व्यक्त केला. “माझ्या पहिल्या चित्रपटात त्यांनी पडद्यावर माझ्या आईची भूमिका साकारली होती. त्यामुळे स्क्रीनवर मला भेटलेल्या त्या पहिल्या आई आहेत”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.