राष्ट्रवादीत शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ असा सामना सुरू झाल्यानंतर विशेषतः विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार शरदनिष्ठांसाठी “संजय राऊत” यांच्या भूमिकेत आले आहेत. गेले काही दिवस ते दररोज सकाळ – दुपार – संध्याकाळ पत्रकारांसमोर येऊन बाईट देत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका मांडताना ते भाजपवर शरसंधान साधत आहेत. भाजपवर त्यांनी शरसंधान साधणे स्वाभाविक आहे. पण त्या पलीकडे जाऊन ते जी वेगवेगळी “राजकीय भाकिते” करत आहेत, त्यामुळेच रोहित पवारांचे राजकीय रूपांतर “संजय राऊत” यांच्यात झाल्याचे दिसून येत आहे. Rohit pawar turnes Sanjay raut for sharad pawar faction, but why dr. Amol kolhe keeps silence
संजय राऊत जसे दररोज सकाळी 9.00 वाजता पत्रकार परिषद घेऊन राजकीय बाण सोडत असतात, ते संध्याकाळपर्यंत हवेत विरून जातात, तसेच आता रोहित पवारांचे झाले आहे.
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पुड्या
अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, अशा “राजकीय पुड्या” पवारनिष्ठ पत्रकारांनी सोडून झाल्यानंतर त्याला रोहित पवारांनी गेल्या दोन दिवसांमध्ये हवा द्यायला सुरुवात केली आणि त्या पलीकडे जाऊन अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भांडण लावून भाजप स्वतःचाच मुख्यमंत्री करणार असल्याची “राजकीय पुडी” रोहित पवारांनी सोडून दिली. जणू काही 115 आमदारांच्या भाजपला स्वतःचा मुख्यमंत्री करायला एकनाथ शिंदे आणि अजित पवार स्वतःच्या राजकीय बळावर अडकाठीच आणू शकतात, असा भ्रम रोहित पवार पसरवत आहेत.
मर्यादित ताकदीची जाणीव
वास्तविक एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना असा कोणताही भ्रम झालेला नाही. तसा भ्रम बाळगणे राजकीय दृष्ट्या या दोन्ही नेत्यांना परवडणार नाही. कारण या दोन्ही नेत्यांची स्वतःची ताकद फार मर्यादित आहे. सध्या जे राजकीय बळ त्यांना मिळाले आहे, ते भाजपने पुरविले आहे आणि त्याची या दोन्ही नेत्यांना पक्की जाणीव आहे.
पण आता जसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे खरे राजकारण खेळण्यासारखे काही उरले नाही, तेव्हा संजय राऊतांसारखे प्रवक्ते पुढे करून उद्धव ठाकरे आपला किल्ला लढवत आहेत, तसेच शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या गोटातही खरे राजकारण खेळायला काही उरले नसावे म्हणून रोहित पवारांना पुढे केले गेले आहे.
पवारांभोवती संशयाचे मळभ
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जसे राजकीय घमासान सुरू आहे आणि त्यामागे दोघांच्याही विशिष्ट प्रामाणिक राजकीय भूमिका आहेत, तशी प्रामाणिक राजकीय भूमिका शरद पवारांची नाही. उलट शरद पवारांनीच अजित पवारांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला पाठवून दिले आणि स्वतः
I.N.D.I.A आघाडीत फूट पाडायला बसून राहिले आहेत, असे शरद पवारांभोवती संशयाचे मळभ दाटले आहे. राष्ट्रवादीतल्या संघर्षावर गेले काही दिवस ते पूर्ण मौन बाळगून आहेत. खासदार सुप्रिया सुळे देखील काही बोलायला तयार नाहीत.
डॉ. अमोल कोल्हे गप्प
शरद पवारांनीच आपल्या राष्ट्रवादीचे प्रचार प्रमुख नेमलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे हे देखील भाजपची खेळी समजावून सांगणारा व्हिडिओ केल्यानंतर गप्प आहेत. त्या गोष्टीलाही आता 8 – 15 दिवस उलटून गेले. त्यानंतर अमोल कोल्हेही काही बोललेले नाहीत. वास्तविक अमोल कोल्हे यांना शरद पवारांनी राष्ट्रवादीचे प्रचार प्रमुख नेमल्यानंतर त्यांनी पुढे येऊन रोज शरदनिष्ठ राष्ट्रवादीची भूमिका मांडणे स्वाभाविक ठरले असते. पण मूळात जी भूमिकाच संशस्यास्पद आहे आणि ज्यांच्याविषयी संशयाचे दाट मळभ दाटले आहे, त्या भूमिकेविषयी आणि त्या नेत्याविषयी आपण काय बोलायचे??, असा प्रश्न जर डॉ. अमोल कोल्हे यांना पडला असेल, तर तोही गैर मानता येणार नाही. उलट मौन बाळगणे ही अमोल कोल्हे यांची राजकीय चतुराई किंवा राजकीय प्रगल्भता मानावी लागेल.
त्यामुळे शरद पवार सुप्रिया सुळे यांच्याप्रमाणेच प्रचार प्रमुख डॉ. अमोल कोल्हे हे देखील सूचक मौन बाळगून आहेत.
माध्यमांचे नवे “हिरो”
या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये रोहित पवार मात्र “संजय राऊत” यांच्या भूमिकेत येऊन शरदनिष्ठ राष्ट्रवादीचा किल्ला लढवत आहेत. पण हा किल्ला खरंच शरदनिष्ठांकडे राहणार आहे, की शरद पवार आपल्या उरलेल्या राष्ट्रवादीचा किल्ला अजितदादांकडे शरणागत करून त्याची कायमची वासलात लावणार आहेत??, हे अजून ठरायचे आहे. तोपर्यंत रोहित पवार “संजय राऊत” यांच्या भूमिकेत शरदनिष्ठ राष्ट्रवादीचा किल्ला लढवत राहणार आणि मराठी माध्यमे त्यांना “हिरो” ठरवणार, हे “रिटन स्क्रिप्ट” आहे!!
Rohit pawar turnes Sanjay raut for sharad pawar faction, but why dr. Amol kolhe keeps silence
महत्वाच्या बातम्या
- कटिहार गोळीबार प्रकरणी गिरीराज सिंह यांचे नितीश कुमार सरकारवर टीकास्त्र, म्हणाले ‘धृतराष्ट्र बनले आहेत…’
- द्रष्टे उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर; राज्य सरकारची घोषणा
- राष्ट्रवादीत कोण कुणाकडे?? : झाकली मूठ फक्त 54 आमदारांची; पण स्वप्नं मात्र मुख्यमंत्री पदाची!!
- भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात अडकलेल्या ‘सिंधू साधना’ संशोधन जहाजातून आठ शास्त्रज्ञांसह ३६ जणांची केली सुटका!