प्रतिनिधी
जालना – महाराष्ट्रातल्या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून राजकीय धुमशान चालले असताना भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी आघाडीच्या नेत्यांना एक खोचक सल्ला दिला आहे. Raosaheb danve patil targets MVA over chief ministership
गावागावांमध्ये सरपंचपद जसे लोक एकमेकांमध्ये वर्षा दोन वर्षांसाठी वाटून घेतात, त्याप्रमाणे महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी देखील मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावे, असे दानवे पाटील म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही राजकीय कारकीर्द मोठी आहे. ते राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. त्यांनीही एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही मुख्यमंत्रीपदाची संधी आहे. गावात ग्रामपंचायतीमध्ये लोक एक एक वर्ष किंवा दोन दोन वर्ष सरपंचपद वाटून घेतात त्याप्रमाणे महाविकास आघाडीतील पक्षांनी मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावे, असा सल्ला दानवे यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वैयक्तिक भेट झाली या भेटीवर रावसाहेब दानवे यांना विचारले असता राजकारणात भेटीगाठी होत असतात. पण २०२४ मध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढेल, पण त्यावेळी कोणी सोबत येणार असेल तर ते त्यावेळी ठरवले जाईल. राजकारणात कोण, केव्हा आणि कधी जवळ येईल हे सांगता येत नाही, असेही ते म्हणाले. २०१९ मध्ये जनतेचा दबाव असल्यामुळे आम्ही शिवसेनेसोबत एकत्र लढलो परंतु आता शिवसेनेने धोका दिला आहे, याची आठवण दानवे यांनी करून दिली.