नाशिक : राज्यसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभवानंतर आज शिवसेनेचा विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचा विश्लेषणाच्या थपडा खाण्याचा दिवस आहे. विजयाला अनेक बाप असतात. पण पराभवाला कोणी नसते, याचा प्रत्यय शिवसेना नेतृत्व सध्या घेत आहे. पण कट्टर शिवसैनिक संजय पवार यांच्या पराभवाचे नेमके रहस्य काय आहे??, हे मात्र क्वचितच कोणी उलगडून सांगताना दिसत आहे. जे रहस्य सांगत आहेत ते कडेकडेने बोलत आहेत. थेट बोलत नाहीत!! rajyasabha election nilesh rane says about sharad pawar
काँग्रेसने आपल्या कोट्यातली 2 जादा मते आपले उमेदवार इम्रान प्रतापगढींना दिली. पण शिवसेनेला दिली नाहीत. राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना 42 ऐवजी 43 मध्ये पडली. 1 जादाचे मत भाजपच्या गोटातले होते, असे शरद पवार म्हणाले आहेत… पण त्यावर विश्वास कसा ठेवायचा? हा खरा प्रश्न आहे, असे विश्लेषण लोकमतने केले आहे. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांनीही आपल्या पहिल्या प्राधान्यक्रमातली कोट्यातली जादा मते शिवसेना उमेदवार संजय पवार यांना दिली नसल्याचे स्पष्ट आहे. या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांची नावे घेऊन आगपाखड केली आहे.
– निलेश राणे यांचे ट्विट
पण त्या पलिकडे जाऊन माजी खासदार नारायण राणे यांचे चिरंजीव माजी खासदार निलेश राणे आणि ज्यांच्यावर संजय राऊत यांनी नाव घेऊन आगपाखड केली, ते स्वाभिमानी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी या निवडणुकीतले “पवार रहस्य” उघड केले आहे. निलेश राणे यांनी राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर अचूक आणि विवेचन टिपणी करताना जे ट्विट केले आहे, त्यातून हे पवार रहस्य अधिक उघड होते आहे.
निलेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात : या माणसात बिघडवण्याचं आणि जागेवर पलटी मारायचे टॅलेंट आहे, मतांचा कोटा पवार साहेबांनीच वाढवला आणि आता म्हणतात मी त्यात पडलो नाही. आज उद्धव ठाकरेंना कळलं असेल स्व. बाळासाहेब पवार साहेबांबद्दल किती अचूक बोलायचे आणि समजायचे… यासाठी निलेश राणे यांनी टीव्ही 9 मराठीच्या बातमीची लिंक आपल्या ट्विटमध्ये दिली आहे. “शब्द टाकला असता तर कोणी नाही म्हटलं नसतं, पण मी त्यात पडलो नाही; शरद पवारांनी अंग काढून का घेतलं?” या शीर्षकाची ही बातमी आहे.
– “द फोकस इंडिया”चे भाकीत
निलेश राणे यांनी केलेले ट्विट इतके बोलके आहे की त्यावर अधिक विश्लेषण करण्याची जरूरत नाही. “द फोकस इंडिया”मध्ये दोनच दिवसांपूर्वी मी, “2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांचे यश बिनबोभाट; पण 2 वर्षानंतर शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवारापुढे संघर्षाचे ताट!!” या शीर्षकाचा लेख लिहिला होता. याचाच वेगळा प्रत्यय निलेश राणे यांच्या ट्विटमधून येतो आहे.
– देवेंद्र भुयार मुख्यमंत्र्यांवर नाराज, पण निष्ठा पवारांवर
या देवेंद्र भुयार यांचे नाव घेऊन संजय राऊत यांनी आगपाखड केली आहे त्या देवेंद्र भुयार यांनी आपली बाजू मांडताना संजय राऊत म्हणजे काय ब्रह्मदेव नाहीत. त्यांना काय माहिती मी कोणाला मत दिले? माझा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यावर आहे. मी मुख्यमंत्र्यांवरची नाराजी उघडपणे बोललो आहे. ती व्यक्तिगत नाराजी नाही. तर माझ्या मतदारसंघातल्या कामांविषयी आहे, असा खुलासा देवेंद्र भुयार यांनी करून आपल्या निष्ठा नेमक्या कोणाकडे आहेत, हे स्पष्टपणे दाखवून दिले आहे.
– भुयारांवर आगपाखड, पवारांवर मौन
मात्र, संजय राऊत यांनी देवेंद्र भुयार यांच्यावर वैयक्तिक आगपाखड करताना शरद पवार आणि अजित पवार यांना मात्र क्लीन चिट दिली आहे. याचा नेमका अर्थ काय आहे??, हे संजय राऊत यांना विचारले पाहिजे. त्याचा खुलासा त्यांच्याकडून घेतला पाहिजे. पण ते 41 मते मिळवून जिंकले आहेत. याचा अर्थ ते थोडक्यात बचावले आहेत. त्यामुळे ते या कळीच्या प्रश्नाचे उत्तर देतील याची गॅरंटी नाही!! किंबहुना ते खरे उत्तर देणार नाहीत याची गॅरंटी आहे!!