मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुसती संभाजीनगर मध्ये सभा घेण्याची घोषणा केली तर शिवसेनेचे सगळे नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रेकॉर्ड सभेच्या आठवणी काढायला लागले आहेत. Raj Thackeray’s simple announcement; However, Shiv Sena leaders remember Balasaheb’s record meeting
वास्तविक राज ठाकरे यांनी संभाजीनगरच्या जाहीर सभेची फक्त घोषणा केली आहे. आपण बाळासाहेबांच्या सभेचे रेकॉर्ड तोडू. शिवसेनेला खिंडार पाडू, असली काहीही वक्तव्ये त्यांनी केलेली नाहीत. पण तरी देखील शिवसेनेचे मराठवाड्यातले नेते एका पाठोपाठ बाहेर पडून प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. किंबहुना बाळासाहेबांच्या रेकॉर्ड सभेच्या आठवणी त्यांच्या मनात जाग्या झाल्या आहेत.
बाळासाहेब ते बाळासाहेब होते. त्यांच्या जाहीर सभांचे रेकॉर्ड कोणी तोडू शकणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या अजून 14 दिवसांनी होणाऱ्या सभेची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे.
राज ठाकरे महाराष्ट्र दिन 1 मे रोजी संभाजीनगर च्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेणार आहेत. पुण्यातल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली आहे. ही नुसती घोषणा करताच मराठवाड्यातल्या शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ती अस्वस्थता माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या मुखातून बाहेर आली आहे.
– बाळासाहेबांच्या सभा आणि 5000 खुर्च्या
चंद्रकांत खैरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या संभाजीनगरच्या जाहीर सभांची आठवण सांगितली आहे. 8 मे 1988 रोजी विजय मेळाव्यात बाळासाहेबांनी औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर केले होते. ते वज्रलेप झाले आहे. त्यानंतर बाळासाहेबांच्या अनेक रेकॉर्ड सभा संभाजीनगरच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर झाल्या. मग आता त्यांची कुणीही कितीही नक्कल केली आणि प्रयत्न केला तरी ते रेकॉर्ड तुटू शकत नाही. त्यावेळी बाळासाहेबांच्या सभेत लाख – लाख लोक जमिनीवर बसून त्यांचे भाषण ऐकायचे. आता लोक जमिनीवर बसत नाहीत. त्यामुळे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर 5000 खुर्च्या टाकल्या तरी आता मैदान भरून जाते, अशा शब्दांमध्ये चंद्रकांत खैरे यांनी राज ठाकरे यांच्या सभेची खिल्ली उडवली आहे.
आमदार अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांचे रेकॉर्ड कोणी तोडू शकत नाही. कारण नकलाकारांची तेवढी क्षमता नाही. बाळासाहेबांनी इतिहास घडवला. नकलाकार इतिहास घडवू शकत नाहीत, असे शरसंधान अंबादास दानवे यांनी साधले आहे.
राज ठाकरे यांनी नुकतेच नुसती सभेची घोषणा केली आहे, तर शिवसेना नेत्यांची ही अवस्था आहे. प्रत्यक्षात मनसेच्या सभेची तयारी सुरू होईल. दरम्यानच्या काळात वातावरण निर्मिती केली जाईल. त्यावेळी शिवसेना नेत्यांच्या काय प्रतिक्रिया असते ते पाहणे मोठे उत्सुकतेचे ठरणार आहे.
– राज ठाकरे यांची शिवसेनेला भीती का??
पण खरेच शिवसेना नेत्यांची तरी एवढी अस्वस्थता का वाढली आहे?? राज ठाकरे यांचा पक्ष दखल घेण्याजोगा नाही, असे वक्तव्य महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी केले आहे ना!! मग ते मराठवाड्यातल्या शिवसेना नेत्यांसाठी मार्गदर्शक नाही का?? राज ठाकरे यांच्या संभाजीनगरच्या सभेकडे दुर्लक्ष करायला काय हरकत आहे?? शिवसेना नेत्यांना राज ठाकरे यांच्या सभेची अशी कोणती भीती वाटत आहे?? बाळासाहेबांच्या सभेचे रेकॉर्ड ते तोडू शकणार नाहीत, याची शिवसेना नेत्यांना जर खात्री असेल तर ते राज ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेकडे एवढे का लक्ष देत आहेत??, याचे इंगित मराठवाड्यातल्या शिवसेनेच्या ताकदीमध्ये दडले आहे. संभाजीनगर जिल्यात 9 पैकी 7 आमदार शिवसेनेचे आहेत आणि ही ताकद टिकवून ठेवणे हे शिवसेनेसाठी मोठे आव्हान आहे.
– शिवसेनेला आतून सुरुंगाची भीती
मुंबई – ठाणे सोडून मराठवाड्यात संभाजीनगर जिल्ह्यात प्रथम शिवसेना रुजली – वाढली ती बाळासाहेबांच्या कर्तृत्वामुळे आणि स्थानिक नेत्यांच्या कष्टामुळे. पण आज मराठवाड्यात ती शिवसेना एकसंघ राहिली नाही का?? मराठवाड्यातल्या शिवसैनिकांचा आपल्या विद्यमान नेतृत्वावर विश्वास उठला नाही का?? राज ठाकरे मराठवाड्यात येऊन शिवसेनेला आतून सुरंग लावतील याची भीती मराठवाड्यातल्या नेत्यांना वाटत आहे का??
– एमआयएमचा पायरोवा
आधीच एमआयएम पक्षाने मराठवाड्यात चांगलाच पायरोवा केला आहे. त्यात राज ठाकरे यांची भर पडली, तर शिवसेनेचा सामाजिक आणि राजकीय पाया ठिसूळ होण्याची शिवसेना नेतृत्वाला भीती वाटते आहे का??, या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचे खरे राजकीय इंगित दडले आहे आणि त्यामुळेच चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यासारखे नेते राज ठाकरे यांच्या नुसत्या घोषणेने अस्वस्थ होऊन प्रतिक्रिया व्यक्त करायला बाहेर पडले आहेत.