प्रतिनिधी
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित अंधेरी पोटनिवडणूक लढवू नये, असे आवाहन केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या पत्राचा गांभीर्याने विचार करू असे सांगितले होते. यानंतर आता भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकला झाला आहे. भाजपने माघार घेतल्यानंतर राज ठाकरेंनी फडणवीस आणि भाजपचे आभार मानले आहेत. Raj Thackeray’s letter of thanks to Fadnavis after BJP withdrew from Andheri by-elections
राज ठाकरेंचे फडणीवसांना पत्र
राज ठाकरे यांनी ट्विटरवर पत्र लिहित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात याबद्दल आपले आणि आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा शतश: आभार असे ट्वीट राज ठाकरेंनी केली आहे.
या पत्राद्वारे ते म्हणाले, चांगली, सकारात्मक, राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो त्याला तुम्ही प्रतिसाद दिला याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार असे आपल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे.
भाजपच्या निर्णयानंतर भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनीही अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले तसेच आपल्यावर कोणताही दबाव नाही, निराशही नाही पक्षाचा आदेश महत्त्वाचा आहे असे सांगताना ऋतुजा लटके यांना मुरजी पटेल यांनी शुभेच्छा दिल्या.