विशेष प्रतिनिधी
शिर्डी : साईबाबांच्या शिर्डीत राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरात दोन दिवस पक्ष वाढीसाठी जोरदार मंथन झाले. पक्षाध्यक्ष शरद पवार अखेरच्या सत्रात थेट ब्रीच कँडी हॉस्पिटल मधून शिर्डीत येऊन बोलले. पक्ष कार्यकर्त्यांना चार्ज केले. त्यांचे उर्वरित भाषण दिलीप वळसे पाटलांनी वाचून दाखविले. परंतु त्यावेळी अजितदादा पवार मात्र व्यासपीठावर नव्हते. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा राजकीय वर्तुळात जास्त रंगली. Praful Patel asks why NCP is not number 1
- प्रफुल्ल पटेल यांचे परखड मंथन
बाकी सर्व नेत्यांची भाषणे स्वाभाविकपणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन करणारी होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने जे नाव शिर्डीतल्या शिबिराला दिले होते, त्या मंथनाविषयी मात्र पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल अधिक परखडपणे बोलल्याचे दिसले. त्यांनी, शरद पवार हे महाराष्ट्रातले निर्विवाद सर्वात मोठे नेते आहेत आणि त्यांना आदर्श मानून राष्ट्रवादी काँग्रेस वाटचाल करते आहे तरी देखील पक्ष महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर का नाही??, असा सवाल केला. इतकेच नाही, तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी मंथन करावे, असे आवाहन करून प्रफुल्ल पटेलांनी विधानसभेच्या सर्व जागांचा तपशीलवार उल्लेख करत आढावा घेतला. यात विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस कशी कमी पडते हे स्पष्टपणे सांगितले. मात्र,
प्रफुल्ल पटेल यांच्या भाषणानंतर राष्ट्रवादीच्या मंथन शिबिराच्या अखेरीस विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने मिशन 100 घोषणेचा पुनरुच्चार केला आहे.
- बहुमताचा आकडा 145, पण…
याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनायचे आहे. स्वपक्षाचा मुख्यमंत्री करायचा आहे. परंतु प्रफुल्ल पटेलांच्या मात्र मूळ प्रश्नाचे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिशन 100 मधून मिळताना दिसत नाही. कारण मूळातच ज्या महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत, तेथे राष्ट्रवादीने आपले मूळ ध्येयच 145 पेक्षा कमी म्हणजे मिशन 100 वर ठेवणे यातच एक राजकीय उणे पण आहे. कारण असे मिशन ठेवल्याने राष्ट्रवादी कधीच स्वबळावर बहुमताचा आकडाच गाठू शकणार नाही. याचा दुसरा अर्थ असा की राष्ट्रवादी कायमच आघाडीचे राजकारण करत राहील आणि आघाडीच्या राजकारणात मित्र पक्षांबरोबर राष्ट्रवादीचा सुप्त संघर्ष होत राहील.
- बाकीचे मित्र पक्ष काय करणार?
राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरात मिशन 100 ची घोषणा झाल्यानंतर माध्यमांनी सध्या महाविकास आघाडीत असलेले घटक पक्ष काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष नेमक्या किती जागा लढवणार आणि त्यांच्या किती जागा निवडून आणणार?? या विषयाची चर्चा सुरू केली आहे. पण मूळातच राष्ट्रवादीने स्वतःचे ध्येय ठरवताना बहुमताच्या खूप अलिकडेच पक्षाची झेप ठेवली आहे, हे मात्र कुणी बोलताना दिसत नाही.
- राष्ट्रवादीच्या मर्यादित यशाचे इंगित
कोणत्याही राजकीय पक्षाचे मूळ ध्येय संपूर्ण बहुमताने जिंकून येऊन सत्तारूढ होण्याचे असते. इथे मात्र मुदलातच राष्ट्रवादीने आपले ध्येय महाराष्ट्र विधानसभेच्या बहुमतापेक्षा तब्बल 45 ने कमी ठेवले आहे. हा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने कळीचा आहे आणि प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या मंथन शिबिरातल्या भाषणात खऱ्या अर्थाने त्यावर बोट ठेवले होते. परंतु त्यांच्या भाषणानंतरही राष्ट्रवादीच्या ध्येयात फरक पडलेला दिसत नाही. यातच राष्ट्रवादीच्या मर्यादित यशाचे राजकीय इंगित दडले आहे.
Praful Patel asks why NCP is not number 1
महत्वाच्या बातम्या