विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिंदे – फडणवीस सरकार मधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जी शिव्या शेरेबाजी केली, त्यातून महाराष्ट्रात मोठी राजकीय राळ उडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी संतप्त होऊन अब्दुल सत्तारांवर टीकेचा भडीमार केला आहे. अब्दुल सत्तारांचे वक्तव्य सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारेच होते. राज्य महिला आयोगाने अब्दुल सत्तारांवर कायदेशीर कारवाईचा बडगाही उभारला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर संतापल्यानंतर त्यांनी खेद व्यक्त करून या विषयावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला आहे. Political uncultured speeches in maharashtra
महाराष्ट्राची परंपरा
पण राजकारणात मतैक्य आणि मतभेद राहतातच. राजकीय नेते मग ते वरिष्ठ असोत, अतिवरिष्ठ असोत अथवा कनिष्ठ असोत ते एकमेकांविरुद्ध उभे ठाकून तोफा डागतातच. पण हे सर्व करताना त्यांनी विशिष्ट राजकीय सभ्यतेच्या मर्यादाही पाळाव्यात, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. त्यातही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विशिष्ट मर्यादा पाळून एकमेकांवर शरसंधान साधण्याचीही परंपरा आहे. या परंपरेविषयी सगळ्या राजकीय पक्षांचे सगळेच नेते उच्चरवाने बोलतात, पण कृती मात्र तशीच करतील याची कुठलीही गॅरंटी देता येत नाही. कारण प्रत्येक पक्षात सभ्यतेच्या मर्यादा ओलांडून शरसंधान साधणारे नेते आहेतच. त्याला कोणताही पक्ष अपवाद नाही.
बाळासाहेबांची भाषणे
अगदी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देखील अनेकदा सभ्यतेच्या मर्यादा ओलांडून विरोधकांना ठोकून काढायचे. मग ते शब्द येडझ* मुलायम असो, की बारामतीचा म्हमद्या, मैद्याचे पोते वगैरे शेलक्या शिव्या असोत. बाळासाहेब धरबंद न ठेवता बोलायचे. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचे धकून गेले. ठाकरी भाषा म्हणून त्याचा गौरव केला गेला. पण ती खऱ्या अर्थाने सभ्यतेची भाषा नव्हती, ही वस्तुस्थिती आहे.
संजय राऊतांची असभ्य भाषा
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात जाण्यापूर्वी संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या नावाने भर पत्रकार परिषदेत शिव्या दिल्या होत्या. वर महाराष्ट्राची भाषा अशीच आहे. आचार्य अत्रे आणि बाळासाहेब ठाकरे अशीच भाषा वापरायचे, अशी मखलाशी केली होती.
पवारांचे हातवारे
पण शिव्या फक्त बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत हेच द्यायचे असे नाही. दस्तुरखुद्द शरद पवारांनी देखील काडी पैलवान वगैरे शब्दांनी बाळासाहेबांचा समाचार घेतला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तर शरद पवारांनी तृतीय पंथीयांसारखे हातवारे करून देवेंद्र फडणवीसांवर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळच्या सभेत टीकास्त्र सोडले होते. ते हातवारे आणि ती भाषा सभ्यतेची मर्यादा ओलांडणारेच होते. त्यावेळी शरद पवारांवर देखील अशीच चौफेर टीका झाली होती.
सक्षणा, अजित दादा आणि सुप्रिया सुळे
शरद पवार, अजितदादा पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची एक तरुण नेता सक्षणा सलगर हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख वाटाणा आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फुटाणा असा करून राजकीय सभ्यतेची मर्यादा ओलांडली होती. त्यावेळी अजितदादांनी सुप्रिया सुळे यांना सक्षणा सलगरला आवरा, अशी सूचनाही केली होती. परंतु सुप्रिया सुळे यांनी तेव्हा पब्लिकला असेच आवडते असे सांगून सक्षणा सलगरला अडवले नव्हते.
अब्दुल सत्तार यांची मर्यादा ओलांडणी
सभ्यतेच्या मर्यादा हा सर्वपक्षीय नेत्यांसाठी एकमेकांना उपदेश करण्याचाच विषय राहिला आहे. सर्वच पक्षांचे नेते सभ्यतेच्या मर्यादा ओलांडू नयेत असे उच्चरवाने सांगतात, पण याच पक्षांचे नेते राजकीय कृतीत मात्र अनेकदा सभ्यतेच्या मर्यादा ओलांडताना दिसतात. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंवर शिव्या शेरेबाजी करून या सर्वांवर ताण केली आहे.
वाजपेयींचे आदर्श उदाहरण
खरं म्हणजे समोरच्या नेत्यावर शरसंधान साधताना असभ्य भाषा वापरली म्हणजेच आपला हेतू साध्य होतो, असे समजणे देखील राजकीय चूकच आहे. किंबहुना अतिशय शेलक्या शब्दांमध्ये टोचून पण सभ्यतेने समोरच्याला सुनावताही येते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यासाठी आदर्श उदाहरण मानता येईल. वाजपेयी आपल्या उगवत्या वक्तृत्वाने विरोधकांना अक्षरशः घायाळ करायचे. पण ते करताना सभ्यतेच्या मर्यादा ते ओलांडायचे नाहीत. त्यांची टीका खरंच विरोधकांना लागायची. ते त्यांचे वाभाडे काढायचे पण सभ्यतेच्या मर्यादा न ओलांडल्यामुळे विरोधकांनाही त्यांच्यावर बोलताना जपूनच बोलावे लागायचे.
एकनाथ शिंदेंचे सूचक खोचक उद्गार
सभ्यतेच्या मर्यादा ओलांडता विरोधी नेत्याला कसे नामोहरम करता येते, याचे उत्तम उदाहरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत नुकतेच विधानसभेत घडले होते. धनंजय मुंडे यांच्या भाषणाला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी अतिशय सूचकपणे देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर दया, करुणा सगळी दाखवली. पण इथून पुढे दया करूणा दाखवता येईलच असे नाही, असे सूचक उद्गार काढून धनंजय मुंडे यांना घायाळ केले होते. पण यात एकनाथ शिंदे यांनी कुठेही सभ्यतेची मर्यादा ओलांडली नव्हती. उलट त्यांचे उद्गार खोचक म्हणून सर्वांच्या लक्षात राहिले. उत्तम वक्तृत्वाला कौशल्य लागते. ते मेहनतीने विकसित करावे लागते. पण सभ्यतेने बोलायला कौशल्य लागत नाही. नेते साधे, सरळ सर्वसामान्यांसारखे वागायला लागले, तर सभ्यता अंगी बाणवणे त्यांना अवघड नाही.
Political uncultured speeches in maharashtra
महत्वाच्या बातम्या
- T-20 विश्वचषकात भारत सेमीफायनलमध्ये; नेदरलँड विरुद्ध पराभूत दक्षिण आफ्रिका पुन्हा “चोकर”
- मशाल पेटली, अंधेरी जिंकली; पण विजयात मुस्लिम मतांचा वाटा असेल तर…
- महाराष्ट्रात कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजना लागू; नोंदणी फक्त १ रुपयात
- महाराष्ट्रात मोठी नोकर भरती; आरोग्य खात्यात 10568 जागा, तर ग्रामविकास मध्ये 11000 जागा