प्रतिनिधी
मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर आमने-सामने आले आहेत. OBC reservation : jitendra Awhad – Gpoichand Padalkar political fight
ओबीसी आज आरक्षण मागत असले तरी प्रत्यक्ष लढाईच्या वेळी ते मैदानात नव्हते. त्यावेळी दलित – वंचित हेच मैदानात होते. त्यामुळे माझा ओबीसींवर विश्वास नाही. त्यांच्यावर ब्राह्मण्यवादाचा पगडा आहे, असे वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटल्या असून भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हाड यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे.
जितेंद्र आव्हाड हे प्रस्थापितांचे कंत्राटी कामगार आहेत. त्यांना इतिहास नीट माहिती नाही. बहुजनांशी त्यांचा संबंध नाही. ज्यावेळी मंडल आयोगाने सर्वांना आरक्षण दिले त्यावेळी प्रस्थापित नेते त्या आरक्षणाच्या विरोधात उभे राहिले होते. बहुजनांची आणि ओबीसींची मुले स्वतःला पेटवून घेत होती. त्यावेळी जितेंद्र आव्हाड कुठे होते?, असा सवाल पडळकर यांनी केला आहे. मंडल आयोगाच्या लढाईत 40 ओबीसींनी आपले प्राण वेचले आहेत, याची आठवण पडळकर यांनी करून दिली. मंडल आयोगाच्या लढ्यात ओबीसी नव्हते, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केल्याबद्दल पडळकर यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.
एकीकडे ट्रिपल टेस्ट मध्ये महाराष्ट्राचे ठाकरे – पवार सरकार अपयशी ठरले असताना त्यामुळेच सुप्रीम कोर्टमध्ये ओबीसी राजकीय आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. त्यापलिकडे जाऊन जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींच्या लढाई करण्याच्या सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह लावल्याने त्यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून उमटताना दिसत आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या या वादग्रस्त वक्तव्य मागे नेमके कोण आहेत याची ही सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.