प्रतिनिधी
कोल्हापूर – राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर येथील जिल्हापरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या विरोधात सुप्रिम कोर्टात जाण्याचा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. OBC leader prakash shendge to go to supreme court against holding ZP elections without OBC reservation
ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करताच ओबीसी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात सभा, प्रचार करण्यास बंदी आहे. शाळा, कॉलेज बंद आहेत. अशा परिस्थितीत निवडणुका कशा काय घेता असा सवाल प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. जर अशा काळात निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये नागरिकांचे मृत्यू झाले तर सरकारविरोधात आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, असा इशाराही त्यांनी दिला.
शेंडगे म्हणाले की खरे म्हणजे राज्य सरकारच या निवडणुकांच्या विरोधात सुप्रिम कोर्टात जाणे अपेक्षित होते. परंतु ते आद्यप गेले नाहीत त्यामुळे आम्ही लवकरच सुप्रीम कोर्टात याविरोधात जाणार आहोत आणि यामध्ये राज्य सरकार आणि निवडणूक आयोग यांना प्रतिवादी करणार आहोत, अशी घोषणा प्रकाश शेंडगे यांनी केली आहे
कोरोनाची संख्या वाढत असताना अशा पद्धतीच्या निवडणुका घेतातच कशा.?? आम्ही ओबीसी जन मोर्चाचे नेते एकत्र आलो आहोत आणि या पाच जिल्ह्यांचा दौरा करणार आहोत. तेथे जाऊन आम्ही या निवडणुका आम्ही कशा थांबवायच्या याची रणनीती तयार करू. कुठल्याही परिस्थितीत आम्ही या निवडणुका होऊ देणार नाही. आगामी काळात जर गरज पडली तर एक नवीन पर्याय देखील आम्ही निर्माण करू शकतो. आता ओबीसी समाजातील सर्व घटक एकत्र आले आहेत आणि आम्ही त्या माध्यमातून या दोन्ही मोठ्या पक्षांना शह दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही शेंडगे यांनी दिला.