प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेल्या खासदार राहुल शेवाळे यांना गद्दार म्हणत शिवसैनिक व भीमसैनिकांनी पिटाळून लावले, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. तसेच, या घटनेचा व्हिडिओही जारी केला आहे.MP Rahul Shewale’s disclosure on the viral VIDEO made viral by the Thackeray group
मात्र, खासदार राहुल शेवाळे यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे की, एका व्हिडिओसह माझ्याविषयी गैरसमज पसरवणारी माहिती समाज माध्यमांवर पोस्ट केली जात आहे. मुळात तसे काहीही घडले नाही. विरोधकांचे हे घाणेरडे राजकारण आहे.
ठाकरे गटाचा दावा काय?
ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनात घटनेविषयी माहिती देताना म्हटले आहे की, चेंबूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी खासदार शेवाळे आले होते, परंतु त्यांना हजारो भीमसैनिकांनी गेटजवळच रोखून धरले. ‘तुझी लायकी नाही बाबासाहेबांना हार घालायची! चालता हो!’ असे म्हणत भीमसैनिकांनी शेवाळे यांना अक्षरश: हाकलून लावले. त्यांचा संताप पाहून शेवाळे यांना घाम फुटला. काही अनुचित घडण्यापूर्वीच त्यांनी तिथून काढता पाय घेतला. या घटनेच्या धास्तीने नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्या उद्यानातील आपला पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केला.
खासदार राहुल शेवाळे काय म्हणाले?
चेंबूरमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी ज्या ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली होती. त्या ट्रॉलीमध्ये मी उभा होतो. त्यावेळी सुजात आंबेडकर यांच्या समर्थकांनी त्यांना आणि अमन आंबेडकर यांना ट्रॉलीमध्ये घेण्यासाठी आग्रह धरला. ट्रॉलीमध्ये माणसांची सख्या मर्यादित ठेवावी लागते, अन्यथा दुर्घटना होऊ शकते. त्यावेळी मी सुजात आंबेडकर यांना ट्रॉली मध्ये येण्यासाठी सांगितले आणि माझ्या सद्सदविवेकबुद्धीला स्मरून मी स्वतः हुन ट्रॉली मधून खाली उतरलो. कोणीही मला खाली उतरण्यास सांगितले नव्हते.
वाचा राहुल शेवाळेंची सविस्तर प्रतिक्रिया…
कोणत्याही विषयावर खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करण्याची चढाओढ सध्या सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून एका व्हिडिओसह माझ्याविषयी गैरसमज पसरवणारी माहिती कालपासून समाज माध्यमांवर पोस्ट केली जातेय. वास्तविक, काल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने देशभरात आनंदाचं वातावरण होतं. मुंबईत देखील गेल्या दोन वर्षांच्या कोविड संकटानंतर जागोजागी मोठ्या दिमाखात जयंती साजरी झाली. मी स्वतः देखील चैत्यभूमी आणि अनेक मंडळाच्या कार्यक्रमात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात दिवसभर व्यस्त होतो. जयंतीच्या मंगलमय वातावरणाला गालबोट लागायला नको, म्हणून मी शांत होतो. पण हा गैरसमज वाढायला नको, म्हणून माझी भूमिका स्पष्ट करतो.
चेंबूरच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर माझ्या पाठपुराव्याने आणि माझ्याच खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे लोकार्पण माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि माननीय केंद्रीय मंत्री श्री रामदासजी आठवले यांच्या शुभहस्ते अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी रात्री अकरा वाजता करण्यात आले. त्यानंतर या सर्व मान्यवरांसह मी देखील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून अभिवादन केले होते.
त्यानंतर रात्री बारा वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी ज्या ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली होती, त्या ट्रॉली मध्ये माझ्यासह माजी मंत्री श्री चंद्रकांतजी हांडोरे, आमदार श्री प्रकाश फातर्फेकर आणि ट्रॉली ऑपरेटर उभे होते.
त्यावेळी श्री सुजात आंबेडकर यांच्या समर्थकांनी त्यांना आणि अमन आंबेडकर यांना ट्रॉली मध्ये घेण्यासाठी आग्रह धरला. ट्रॉली मध्ये माणसांची सख्या मर्यादित ठेवावी लागते, अन्यथा दुर्घटना होऊ शकते. त्यावेळी ट्रॉली मधून बाहेर पडावे की नाही, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न होता. पण आंबेडकरांचे वंशज जर अभिवादन करण्यासाठी ट्रॉली मध्ये येत असतील, तर त्यात काय गैर? असा विचार मी केला. त्यावेळी मी सुजात आंबेडकर यांना ट्रॉली मध्ये येण्यासाठी सांगितले आणि माझ्या सद्सदविवेकबुद्धीला स्मरून मी स्वतः हुन ट्रॉली मधून खाली उतरलो. कोणीही मला खाली उतरण्यास सांगितले नव्हते. पण मी स्थानिक लोकप्रतिनिधी असूनही स्वतः हून एक पाऊल मागे येत ट्रॉली मधून खाली उतरलो. यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी माझ्या या कृतीला दाद देऊन आदर देखील व्यक्त केला. असाच प्रकार या आधी देखील झाला होता. तेव्हासुद्धा मी त्यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांना पुढे जायला सांगून ट्रॉलीमधून उतरलो होतो. पण तेव्हा असा गैरसमज पसरवला गेला नव्हता. पण यावेळी केवळ राजकीय सुड बुध्दीने व्हिडिओ सोबत चुकीचा मजकूर जोडून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही जणांनी हेतुपुरस्सर केला आहे. माझी त्या सर्वांना विनंती आहे की हा विषय राजकारणाचा नाही. तुम्ही केवळ गैरसमज पसरवत नसून आंबेडकरी जनतेच्या भावनांचा अनादर करत आहात. तेव्हा या गोष्टी त्वरित थांबवा. अन्यथा कायदेशीर कारवाईसाठी तयार रहा! शेवटी इतकंच सांगेन की तुमच्या या घाणेरड्या राजकारणामुळे माझ्यासारखा आंबेडकरी अनुयायी बिलकुल डगमगणार नाही! जय भीम !
राहुल रमेश शेवाळे, खासदार (दक्षिण-मध्य मुंबई) –
MP Rahul Shewale’s disclosure on the viral VIDEO made viral by the Thackeray group
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सभेत भीषण स्फोट
- जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर स्मोक बॉम्बने हल्ला, भाषणादरम्यान झाला स्फोट
- Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेला १ जुलैपासून प्रारंभ; १७ एप्रिलपासून सुरू होणार नोंदणी
- गुजरातमध्ये आम आदमी पार्टीला मोठा धक्का, सुरतमधील ‘आप’चे सहा नगरसेवक भाजपमध्ये दाखल!