• Download App
    पुण्यात राज ठाकरेंची पत्रकार परिषद; एकनाथ खडसेंची सीडी, मराठा- ओबीसी आरक्षण अन् महापालिका निवडणुकांवर भाष्य । MNS Chief Raj Thackeray Press Conference in Pune

    पुण्यात राज ठाकरेंची पत्रकार परिषद; एकनाथ खडसेंची सीडी, मराठा- ओबीसी आरक्षण अन् महापालिका निवडणुकांवर भाष्य

    MNS Chief Raj Thackeray Press Conference in Pune : मनसेप्रमुख राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती शहर कार्यालयाचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी खडसेंची ईडी चौकशी, राज्यातील आरक्षणाचा प्रश्न, आगामी महापालिका निवडणुका तसेच इतर विविध मुद्यांवर प्रतिक्रिया दिली. MNS Chief Raj Thackeray Press Conference in Pune


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : मनसेप्रमुख राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती शहर कार्यालयाचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी खडसेंची ईडी चौकशी, राज्यातील आरक्षणाचा प्रश्न, आगामी महापालिका निवडणुका तसेच इतर विविध मुद्यांवर प्रतिक्रिया दिली.

    खडसे सीडी कधी लावतात याची वाट पाहतोय

    माझ्यामागं ‘ईडी’ लावली तर सीडी बाहेर काढेन, असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले होते. त्यामुळे मी आता एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतात, याची वाट पाहत असल्याचे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे. राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. यापूर्वी काँग्रेसची सत्ता असतानाही तेच झाले होते आणि आता भाजपही तेच करत आहे. ईडीसारखी सरकारी यंत्रणा ही सरकारच्या हातातलं बाहुलं झाल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.

    आरक्षण सर्वांनाच मान्य, तर अडलं कुठे?

    आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण सर्वांनाच मान्य आहे तर अडलं कुठं? आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांची माथे भडकावून केवळ राजकारण करायचे आहे का? जे मराठा आरक्षणाच्या बाबतीत आहे. तेच ओबीसी आरक्षणाबाबत आहे. ओबीसींचं आरक्षणही सर्वांना मान्य आहे तर अडलं कुठे? तुम्ही कोर्टात आरक्षणाची बाजू व्यवस्थित का मांडत नाहीत? एकमेकांकडे बोट का दाखवत आहात? एकदा या सर्वांना एका व्यासपीठावर आणा आणि विचारा, असं ते म्हणाले.

    सहकाराबद्दल पवारच सांगतील

    केंद्रात नवीन सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आलं आहे. यामुळे राज्यातील सहकार चळवळीला धोका निर्माण झाला आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर राज ठाकरे म्हणाले की, तुम्ही पवार साहेबांनाच विचारा. तेच करेक्ट सांगतील.

    महापालिका निवडणुकीची तयारी

    राज ठाकरे एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले की, महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. कार्यालयाची गरज होती म्हणून नवं कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. अजून निवडणुकांना वेळ आहे. सर्वच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. शेड्युलप्रमाणे फेब्रुवारीत निवडणुका व्हायला पाहिजे, पण पुढे काय होईल माहीत नाही, असं सांगतानाच निवडणुकीची रणनीती काय असेल हे तुम्हाला का सांगू?, असेही ते म्हणाले.

    MNS Chief Raj Thackeray Press Conference in Pune

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य