• Download App
    मराठा आरक्षण : अशोक चव्हाण यांना दिला जाणार ‘विश्वासघातकी’ पुरस्कार, राज्यव्यापी बैठकीत निर्णय । Maratha Reservation Vinayak Mete criticizes Ashok Chavan, Mumbai Maha Morcha Planning In Next Month

    मराठा आरक्षण : अशोक चव्हाण यांना दिला जाणार ‘विश्वासघातकी’ पुरस्कार, राज्यव्यापी बैठकीत निर्णय

    Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. 24 जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी या बैठकीला हजेरी लावली. मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर या बैठकीत जोरदार टीका करण्यात आली. यामुळे अशोक चव्हाण यांना आता विश्वासघातकी पुरस्कार देणार असल्याची टीका शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. Maratha Reservation Vinayak Mete criticizes Ashok Chavan, Mumbai Maha Morcha Planning In Next Month


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. 24 जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी या बैठकीला हजेरी लावली. मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर या बैठकीत जोरदार टीका करण्यात आली. यामुळे अशोक चव्हाण यांना आता विश्वासघातकी पुरस्कार देणार असल्याची टीका शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे.

    अशोक चव्हाण यांनी उपसमितीचे अध्यक्ष असूनही मराठा समाजाच्या विरोधात निर्णय घेतले. अशोक चव्हाण यांची तत्काळ हकालपट्टी करण्याची मागणीही मेटे यांनी केली आहे.

    मेटे पुढे म्हणाले की, 102व्या घटनादुरुस्तीचा जो कायदा करण्यात आला आहे, त्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. राज्य सरकार काहीही पावलं उचलत नाही. बैठकीत उद्धव ठाकरे सरकारबाबत प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी मोदी सरकारच्या अभिनंदनाचा ठराव पास करण्यात आला. तसंच अजित पवार यांच्या अभिनंदनाचाही ठरावं करण्यात आला. त्यांनी सारथी संस्थेबाबत उत्तम काम केल्याचं मेटेंनी सांगितलं.

    राज्य मागासवर्ग आयोगावर टीका

    राज्य मागासवर्गीय आयोगात काम करणारे बहुतांश जण हे मराठा समाजाच्या विरोधात काम करणारे आहेत. मुळात आयोगावरील लोकांना सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. मात्र, लोणावळा येथे आयोजित एका ओबीसी समाजाच्या बैठकीला ही मंडळी गेली होती. तिथे त्यांनी भाषणंदेखील केली. आम्ही आज राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव पास केला. कारण त्यांनी त्यांच्या संस्थेत 1 वर्षे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ केलं आहे, असंही मेटे यांनी यावेळी म्हटलं.

    2 सप्टेंबरला संपूर्ण राज्यात कलेक्टर ऑफिससमोर आंदोलन

    विनायक मेटे म्हणाले की, आता 2 सप्टेंबरला संपूर्ण राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने केली जाणार आहेत. 7 किंवा 8 सप्टेंबरला एक राज्यव्यापी बैठक होईल. गणपती विसर्जनानंतर महामोर्चा काढला जाणार असल्याचेही मेटे यावेळी म्हणाले. आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. त्यानंतर मुंबईत महामोर्चा काढला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

    मेटे उद्या राज्यपालांच्या भेटीला

    विनायक मेटे म्हणाले की, उद्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सकाळी 10 वाजता भेट घेणार आहोत. या भेटीवेळी राज्य सरकार जाणीवपूर्वक आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याबाबत राज्यपालांशी चर्चा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यपालांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाबाबत जाब विचारावा आणि ओबीसी आयोग बरखास्त करावा, अशी मागणीही करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

    Maratha Reservation Vinayak Mete criticizes Ashok Chavan, Mumbai Maha Morcha Planning In Next Month

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य