पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदेला सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय. मनसुख हिरेन यांच्या हत्येत विनायक शिंदेचा सहभाग असल्याचा संशय NIA ला आहे.Mansukh Hiren murder case: Police constable Vinayak Shinde sacked from service
विशेष प्रतिनिधी
मुंबई : संपूर्ण राज्यभरात गाजलेल्या मनसुख हिरेन आणि अँटीलिया बाँब प्रकरणात आणखी एका पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी आणि लखन भैया बनावट चकमक प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या विनायक शिंदेला मुंबई पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. सचिन वाझे, रियाज काझी पाठोपाठ विनायक शिंदे देखील पोलीस दलातून बडतर्फ झाले आहेत.
आतापर्यंत या प्रकरणात सचिन वाझे, रियाज काझी यांनाही बडतर्फ करण्यात आलं आहे, सध्या हे दोन्ही NIA च्या कस्टडीत आहेत. विनायक शिंदे हा लखनभैय्या बनावट चकमक प्रकरणात अटकेत होता. काही महिन्यांपूर्वी तो पॅरोलवर बाहेर आला होता.
विनायक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून पोलीस दलात कार्यरत होता. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) विनायक शिंदे आणि बुकी नरेश धरे यांना अटक केली होती. विनायक शिंदे याने सचिन वाझे सोबत काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर एटीएसचा संशय अधिक बळावला होता.
विनायक शिंदे हा सचिन वाझेसाठी बार मालकांकडून हप्ते गोळा करायचा…तसेच ज्या दिवशी मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्यात विनायक शिंदेचा सहभाग असल्याचा NIA ला संशय आहे.