प्रतिनिधी
संभाजीनगर : संभाजीनगरच्या पाणीप्रश्नावर आज रस्त्यावर अक्षरशः जनसागर लोटला. औरंग्याचा पोपट काय म्हणतो??, पाणी द्यायला नाही म्हणतो!!, अशा घोषणा देत संभाजीनगरकरांनी प्रचंड आक्रोश मोर्चात सत्ताधारी शिवसेनेचे अक्षरशः वाभाडे काढले. Huge flood in Sambhajinagar
संभाजीनगरात गेली 30 वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने 4 वर्षांपूर्वी संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यासाठी तब्बल 1600 कोटी रुपये मंजूर केले होते. तो निधी तसाच महापालिकेत पडून आहे. महापालिका त्याचे व्याज खाते आहे. पण जायकवाडीच्या धरणात पाणीसाठा असूनही संभाजीनगरवासियांना पाणी मात्र मिळत नाही. त्यामुळे संभाजीनगर मवासियांनी आज प्रचंड जलआक्रोश मोर्चा काढून सत्ताधारी शिवसेनेला धारेवर धरले.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात हजारो महिला आपले रिकामे हंडे घेऊन सहभागी झाल्या होत्या. संभाजीनगर मध्ये पाणीपुरवठा पूर्ण विस्कळीत आहे. त्यात नियमितता नाही. पाण्याची बिले मात्र भरमसाठ घेतली जात आहेत. याबद्दल संभाजीनगरकरांचा संतापच आज रस्त्यावर उफाळून आला. या मोर्चात देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर आदी नेते आघाडीवर होते.
– भाजपची पोस्टर काढून मोर्चाला “हातभार”
या आधी शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपची पोस्टर काढून एक प्रकारे मोर्चाला अनुकूल असे वातावरण तयार करून दिले. कारण मोर्चाच्या चर्चे बरोबरच शिवसेनेने फाडलेल्या पोस्टरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे मोर्चाचा प्रतिसाद कमी होण्याऐवजी वाढला, असेच दिसून आले.
– संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारी
याखेरीज संघटनात्मक पातळीवर भाजपने गेल्या तीन दिवसांपासून जोरदार तयारी चालवली होती. संभाजीनगर मधल्या प्रत्येक वॉर्डात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी रिकाम्या हंड्यांचे पूजन करून महिलांना संघटित केले होते. या सर्व महिला आज रिकामे हंडे घेऊन मोर्चात सहभागी झाल्या होत्या. याचा परिणाम शहरभर तर दिसलाच पण संभाजीनगर च्या ग्रामीण भागातून देशील मोठ्या प्रमाणावर महिला मोर्चात सहभागी व्हायला आल्या होत्या.
– समाजाच्या सर्व स्तरातून सहभाग
महापालिका निवडणूक भाजपा स्वतंत्रपणे लढवणार आहे. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर देखील भाजपने या मोर्चाच्या निमित्ताने जोरदार तयारी करून घेतली आहे. गल्लोगल्ली भाजपच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः घुसून महिलांना संघटित केले. पाणी प्रश्न एवढा जिव्हाळ्याचा असल्याने तो उचलून धरून संभाजीनगरवासियांच्या मर्मालाच एक प्रकारे हात घातला. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भोंगे हा विषय उचलून धरला त्यालाही संभाजीनगरवासीयांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. परंतु पाणी प्रश्न हा त्यापेक्षाही जिव्हाळ्याचा असल्याने आणि तो धार्मिक आणि जातीच्या आवाहनाचा पलिकडचा असल्याने या भाजपच्या या मोर्चाला खऱ्या अर्थाने समाजाच्या सर्व स्तरातून पाठिंबा आणि सहभाग मिळाला.