विनायक ढेरे
मुंबई : परमवीर सिंग यांच्या लेटरबाँम्बने गृहमंत्री अनिल देशमुखांचा “राजकीय बळी” घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्राचे गृह मंत्रालय यांच्यातील “अन्योन्य संबंधां”चीही चर्चा पुढे आली आहे. १९९९ मध्ये स्थापना झाल्यापासून फक्त पाचच वर्षे सत्तेबाहेर राहिलेल्या राष्ट्रवादीच्या ताब्यात उर्वरित काळात महाराष्ट्राचे गृह मंत्रालय होते.from dance bar ban to bar extortion of 100 cr NCP home ministerial progressive journey
शरद पवारांच्या “दमदार” प्रतिमावर्धनात राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांचा मोठा वाटा राहिला आहे. गृह मंत्रालयात काम करण्याची पवारांनी अनेक नेत्यांना संधी दिली… पण राष्ट्रवादीच्या ताब्यातील महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाची वाटचाल… डान्सबार बंदीकार आर. आर. आबा ते बार वसुलीकार अनिल देशमुख व्हाया तेलगीफेम छगन भुजबळ, अशी “उज्ज्वल आणि पुरोगामी” राहिलेली दिसते.
तशी पवारांनी महाराष्ट्राचे गृह मंत्रालय चालविण्याची संधी जयंत पाटील, अजित पवारांनाही काही काळ दिली. अखंड काँग्रेस असताना ती संधी शिकार – घोडसवारी फेम पद्मसिंह पाटलांनाही दिली, पण राष्ट्रवादीच्या काळात आर. आर. पाटील उर्फ आबा, छगन भुजबळ आणि अनिल देशमुख यांनी जेवढे गृह मंत्रालय “गाजवून” सोडले, तेवढे कुणालाही जमलेले नाही…
खुद्द पवारांनाही ते गृह राज्यमंत्री असतानाही… (अर्थात पवारांनी गृह राज्यमंत्री असताना पोलीस बदल्यांमध्ये काही स्लॅब ठरवून दिल्याची चर्चा होती… पण तेव्हाच्या मीडियाने ती फारशी उचलून धरली नव्हती.)
पण महाराष्ट्राचे गृहमंत्री “गाजले” ते आर. आर. आबा… त्यांनी डान्सबार बंदी आणली… त्यावेळी आबांचे खूप कौतूक झाले होते. आबा कसे कणखर गृहमंत्री आहेत… त्यांनी कसे महाराष्ट्राच्या पोलीस खात्याला शिस्तीत आणले वगैरे सुरस कहाण्या मराठी माध्यमे त्या काळात चवीने छापत असत.
मराठी माध्यमांच्या एका सेक्शनने आबांना त्यावेळी फार उचलून धरले होते… पण त्यावेळी देखील डान्सबार बंदीवरच्या चर्चेला एक किनार होती, ती म्हणजे समाजातल्या एका सधन विशिष्ट वर्गाचे, विशेषतः तरूण मुलांचे नुकसान होतेय याची… महाराष्ट्राच्या विशिष्ट भागात गुंठेवारीत ही मुले पैसे मिळवतात आणि पनवेलच्या डान्सबारमध्ये जाऊन उडवतात.
त्यातून व्यसनाधीनता, ड्रग्ज पेडलिंग, बेटिंग वगैरे प्रकारांमुळे मोठे नुकसान झाल्याची विशिष्ट वर्गाच्या अंतर्गत चर्चा होती… त्याचा परिणाम म्हणून डान्सबार बंदी लादण्यात आली… अगदी डान्सबार चालकांकडून देवाण – घेवाण होऊन सुद्धा ही बंदी लादली गेली. त्याचे “श्रेय” आर. आर. आबांना मिळाले.
जयंत पाटलांची मध्यम आणि अजित पवारांची छोटी गृह मंत्रीपदाची कारकीर्द सनसनाटी बातम्यांविना गेली… याचा अर्थ तिथे काही “घडत” नव्हते, असे नव्हे… पण बाहेर काही आले नाही किंवा आणले गेले नाही एवढे मात्र खरे.
छगन भुजबळांची गृह मंत्रीपदाची कारकीर्द गाजली ती तेलगी – स्टँम्प घोटाळा प्रकरणाने… त्यातून बनावट नोटांचे प्रकरण बाहेर आले. त्याचे किती कोटी होते याची तर अजूनही गिनतीच बाहेर आलेली नाही. गोदावरीच्या पात्रातून बरेच पाणी वाहून गेले तरी… पण तेलगीची नार्को टेस्ट झाली. त्यात छगन भुजबळांचे त्याने नाव घेतले. शरद पवारांचे नाव घेतले. त्यावेळी तात्पुरता राजकीय बळी भुजबळांचा घेतला गेला.
आणि आज अनिल देशमुखांचा नंबर लागला… त्यांच्या काळात राष्ट्रवादीने “विक्रम”च गाठला… सेवेतल्या आयपीएस अधिकाऱ्याने थेट गृहमंत्र्यावरच महिन्याला १०० कोटीं रूपयांच्या खंडणीखोरीचा आरोप केला… तो देखील पत्र लिहून… हा “विक्रम” पवारांची राष्ट्रवादी सोडून देशातल्या कोणत्याही राजकीय पक्षाला करता आलेला नाही.
१०० कोटींच्या खंडणीखोरीची सीबीआय चौकशी होऊन त्याची “मोठी राजकीय परिणीती” १५ दिवसांमध्ये समोर येईल… पण आज अनिल देशमुखांना राजीनामा देणे भाग पाडले आहे. ही या प्रकरणाची राजकीय बळीची सुरूवात आहे.
अनिल देशमुख कोणा – कोणाला १०० कोटींच्या सीबीआय चौकशीच्या लपेट्यात घेतात, यावर बरेच काही अवलंबून आहे.पण त्यातून मूळात शरद पवारांना स्वतःची जबाबदारी झटकता येईल का…??, हा १०० कोटींहून अधिक मोलाचा सवाल आहे…!!