प्रतिनिधी
कोल्हापूर : महाराष्ट्रात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मागे हात धुऊन लागली आहे. त्यांचे एकेक घोटाळे बाहेर येऊन कोर्ट केसेस दाखल होत आहेत. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यासारखे मंत्री तुरुंगात आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या नेत्यांना टोचले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासाठी कोल्हापुरात आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ED Action: then why don’t we have ED behind us
आम्ही एवढे वर्षे राजकारणात आहोत. मग आमच्या मागे ईडी का लागत नाही?? आम्ही राजकारणाचा धंदा केला नाही. राजकारण हे कमाईचे साधन मानत नाही, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला आहे.
कोल्हापूर उत्तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर घणाघाती टीका केली. वंचित बहूजन आघाडी भाजपची “बी टीम” नाही. उत्तर प्रदेशसह भाजप चार राज्यात निवडून आले आहे. तिथे काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे मग काँग्रेस भाजपची बी टीम नाही का? , असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.
शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी यांच्या सरकारने ओबीसी आरक्षण ही दिले नाही. त्यामुळे कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीमध्ये बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराचा निश्चित विजय होईल. विधानसभेमध्ये आमचा आमदार जाईल, असं आंबेडकर म्हणाले. कोल्हापूरच्या जनतेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे, असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार लुटारुंचे
ठाकरे – पवार सरकार लुटारूंचे असल्याचा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला. बजेट मधून किती लुटता येईल याची आकडेवारी बाहेर येते आणि त्या लूटीमध्ये आपला वाटा असला पाहिजे त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीची वाटचाल चालू असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले. या निवडणुकीत 25 ते 30 कोटी रूपये खर्च होऊ शकतो. त्याच्या विरोधात आपण लढत आहे, असेही आंबेडकर यांनी म्हणाले.
आमच्यावर नाही ईडीची कारवाई होत!!
आम्ही देखील इतरांच्या एवढीच वर्षे राजकारणात आहोत, तरी ईडीची कारवाई आमच्यावर का होत नाही? असा खोचक सवालही आंबेडकर यांनी केला. राजकारण हे कमाईसाठी आहे, असे मी कधीही मानत नाही. राजकारण हे लोकांच्या सेवेसाठी आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत, असा टोला आंबेडकर यांनी लगावला.
ओबीसीसाठी काय केले? मंत्र्यांना विचारा
ओबीसी आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी अग्रेसर असून आता नुसती रस्त्यावरची लढाई करून उपयोगाची नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे ओबीसी मंत्री प्रचाराला येतील त्या वेळेला त्यांना कॅबिनेटमध्ये ओबीसी आरक्षणा बाबत काय केले याचा जाब विचारा. जर सकारात्मक चर्चा होत नसेल तर मंत्रिमंडळाचा राजीनामा आपण का देत नाही, असा सवाल त्यांना विचारा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.