Nashik Oxygen Leak : नाशिकमध्ये बुधवारी झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन अर्धा तास पुरवठा बंद राहिल्याने तब्बल 22 जणांना प्राण गमवावे लागले. या दुर्दैवी घटनेनंतर अवघ्या महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजन अत्यंत महत्त्वाचा आहे. आधीच ऑक्सिजनच्या तुटवड्याशी राज्याचा संघर्ष सुरू असतानाच नाशकात ऑक्सिजनच्या गळतीमुळे ही मन सुन्न करणारी घटना घडली. या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त करत महाराष्ट्र शोकमग्न झाल्याचे म्हटले आहे. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नाशिकमध्ये बुधवारी झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन अर्धा तास पुरवठा बंद राहिल्याने तब्बल 22 जणांना प्राण गमवावे लागले. या दुर्दैवी घटनेनंतर अवघ्या महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजन अत्यंत महत्त्वाचा आहे. आधीच ऑक्सिजनच्या तुटवड्याशी राज्याचा संघर्ष सुरू असतानाच नाशकात ऑक्सिजनच्या गळतीमुळे ही मन सुन्न करणारी घटना घडली. या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त करत महाराष्ट्र शोकमग्न झाल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र शोकमग्न!
नाशिकच्या घटनेवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी एक निवेदन जारी केले आहे. जनसंपर्क विभागाने जारी केलेल्या या निवेदनात मुख्यमंत्री म्हणाले की, “कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच.
या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत
नाशकातील ऑक्सिजन गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेत प्राण गमावणाऱ्या 22 जणांच्या कुटुंबीयांना राज्यशासनातर्फे 5 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापुढे प्रत्येक रुग्णालयात प्राणवायूच्या साठ्याची काळजी घेऊन त्यांच्या सुयोग्य उपयोग व्हावा तसेच रुग्णांना प्राणवायू मिळण्यातल्या अडचणी दूर झाल्याच पाहिजेत, असे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत.
दुसरीकडे, महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी मात्र नाशिकच्या घटनेसाठी भाजपला जबाबदार ठरवले आहे. भाजप महापौर आणि भाजचे तीन स्थानिक आमदार फरार असल्याचे म्हणत, या घटनेची जबाबदारी भाजपने घ्यावी, असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- दुर्दैवी घटनेतही राजकारण : सचिन सावंतांनी नाशिकच्या घटनेसाठी भाजपला ठरवले जबाबदार, कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर..
- Covaxin : कोरोनाच्या डबल म्युटेंटवरही कोव्हॅक्सिन परिणामकारक, संशोधनाअंती ICMRचा निष्कर्ष
- दुर्दैवाचा हृदय पिळवटून टाकणारा फेरा : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीनंतर 22 रुग्णांचा तडफडून मृत्यू! बळींची संख्या वाढण्याची भीती
- कॅप्टन कुल धोनीच्या घरीही कोरोनाचा शिरकाव, संसर्गानंतर धोनीचे आई-वडील रांचीतील रुग्णालयात दाखल
- गँगस्टर विकास दुबे एन्काउंटर केसमध्ये यूपी पोलिसांना क्लीन चिट, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय