वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्रात रविवारपासून पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या सर्वत्र हवामान कोरडे आहे. मात्र, संध्याकाळी आकाश अंशत: ढगाळ होत आहे. Chance of rain in Central Maharashtra, Marathwada
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात २५ एप्रिलपासून चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस आणि विजांचा कडकडाट होणार आहे. या दोन्ही विभागात २७ एप्रिलनंतर सोसाट्याचा वाराही वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात २६ एप्रिलनंतर वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. कोकणातही पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, शनिवारी कमाल तापमानात वाढ झाली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानाचा पारा ३८ ते ४० अंशांदरम्यान पोचला. विदर्भात कमाल तापमान ४० अंशांपुढे होता. ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४२.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यांत?
मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, परभणी, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत प्रामुख्याने पुढील पाच दिवस पावसाची शक्यता आहे.