विशेष प्रतिनिधी
मुंबई : बऱ्याच महिन्यांनी मातोश्री बाहेर पडून उद्धव ठाकरे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये गेले आणि पुन्हा त्यांनी शिंदे गट आणि भाजपला तेच आव्हान दिले, बाळासाहेबांच्या नावाने मते मागू नका!! चिन्ह चोरलेत, पण माझा बाप चोरू नका!! हिंमत असेल तर मोदींच्या एकट्याच्या नावाने मते मागून दाखवा!! वगैरे वगैरे तीच आव्हाने त्यांनी दिली. आता शिंदे गट काय किंवा भाजप काय किंवा अगदी काँग्रेस काय, त्यांच्यापुढे पण खरे हेच आव्हान आहे, की बाळासाहेबांच्या नावाने मते मागायची नाहीत, तर काय पवारांच्या नावाने मते मागायची?? आणि उद्या खरंच पवारांच्या नावाने मते मागायाचा त्यांनी प्रयत्न केला, तर या तिन्ही पक्षांना पवारांच्या नावाने मते तरी मिळतील का?? हा खरा प्रश्न आहे!!Balasaheb Thackeray : biggest political brand beyond party lines in maharashtra
उद्धव ठाकरे यांनी घसा कोरडा करून कितीही आरडाओरडा केला, मोठा घोष केला तरी बाळासाहेब नावाचा ब्रँड महाराष्ट्रात इतर कोणत्याही ब्रँड पेक्षा मोठा आहे, त्याला खुद्द उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे किंवा भाजप तरी काय करणार??… बाळासाहेबांनी स्वतःच्या कर्तृत्वाने शिवसेना या पक्षापेक्षा स्वतःच्या नावाचा ब्रँड मोठा करून ठेवला आहे. त्याला उद्धव ठाकरे यांचाही इलाज नाही. तसाच शिंदे गट आणि भाजपचाही नाईलाज आहे!!
महाजन – मुंडे ब्रँड होते पण…
भाजपमध्ये प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे नक्की ब्रँड होते. आजही काही प्रमाणात मराठवाड्यात गोपीनाथ मुंडे हा ब्रँड नक्कीच चालतो. पण हे ब्रँड बाळासाहेबांइतके मोठे कधीच नव्हते आणि भाजपलाही बाळासाहेबांच्या तोडीचा ब्रँड महाराष्ट्रात अद्याप तरी निर्माण करता आलेला नाही. बाळासाहेब हे वयाने अटलजी, अडवाणींच्या बरोबरीचे नेते. त्यामुळे अटलजी, अडवाणी हे ब्रँड भाजपसाठी देशभरात चालत असताना महाराष्ट्रात हे तीनही ब्रँड बरोबरीच्या नात्याने चालायचे. या तीनही ब्रँड्सच्या एकत्रित ताकदीला 1996 नंतर, किंबहुना 1991 नंतर खूप वेळा यश मिळाले. महाराष्ट्रात या तीनही ब्रँड्सनी आपली ताकद एकवटून सत्ता पण गाजवली.
वसंतदादा काँग्रेसचा अखेरचा ब्रँड
तेवढा मोठा ब्रँड महाराष्ट्रात वसंतदादा पाटलांनंतर काँग्रेसलाही निर्माण करता आलेला नाही. विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे आणि मध्यंतरीच्या अखंड काँग्रेसच्या काळात शरद पवार हे तीन छोटे ब्रँड काँग्रेसने वापरून पाहिले. पण त्यांचे यश तुलनेत फार मर्यादित ठरले. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली तर अखंड काँग्रेस बहुमतापर्यंत देखील पोहोचू शकली नव्हती. 1995 नंतर काँग्रेस महाराष्ट्रात कोणत्याही ब्रँडच्या नेतृत्वाखाली विधानसभेत शंभरी देखील गाठू शकलेली नाही.
अशा स्थितीत बाळासाहेब नावाचा ब्रँड महाराष्ट्रात चालत असेल तर स्वतः उद्धव ठाकरे काय, एकनाथ शिंदे काय किंवा महाजन मुंडे यांच्या नंतरचा महाराष्ट्र भाजप काय?, हे तीनही पक्ष बाळासाहेबांच्या नावाने मते मागतील ना!! त्यांना दुसरा पर्याय तरी आहे काय??
पवार ब्रँडची मर्यादा राष्ट्रवादीच
शरद पवार यांच्यासारखा ब्रँड हा राष्ट्रवादीच्या पलिकडे कोणाला चालत नाही. गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरे वगळले, तर शिवसेना कायम पवार ब्रँडच्या विरोधातच होती. काँग्रेस देखील स्वतःचे राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरचे ब्रँड सोडून थोडेच पवार ब्रँडच्या नावावर मते मागणार आहे??, त्यांना तसे करणे शक्यही नाही!! सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी याच ब्रँडच्या नावाने काँग्रेसचे नेते मते मागणार. राष्ट्रवादी काँग्रेस ही पवार नावाच्या ब्रँडची नैसर्गिक राजकीय मर्यादा आहे. काँग्रेस सारख्या समविचारी पक्षाला देखील पवार नावाच्या ब्रँडचा फारसा उपयोग नाही!!
उद्धव ठाकरेंची अडचण
अशा स्थितीत अखंड महाराष्ट्रात पक्षांच्या पलिकडे चालेल असा बाळासाहेबांनंतरचा राजकीय ब्रँडच तयार झालेला नाही. बाळासाहेब त्यांच्या हयातीत मुंबई, ठाण्यात सुरुवातीपासून ब्रँड होतेच, पण 1986 नंतर त्यांनी हिंदुत्व अंगीकारले आणि ते संपूर्ण महाराष्ट्राचे सर्वात मोठे राजकीय ब्रँड झाले. ही वस्तुस्थिती नाकारून कसे चालेल?? भले आज ही वस्तुस्थिती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासाठी अडचणीची ठरणारी असेल, पण म्हणून बाळासाहेब नावाचा ब्रँड छोटा होत नाही. लोक त्यांच्याच नावाने मते मागणार आणि वेगवेगळ्या पक्षांमधून निवडून येणार. ही आगामी काही वर्षांसाठी तरी अपरिहार्य वस्तुस्थिती आहे. जोपर्यंत बाळासाहेबांपेक्षाही मोठा नवा राजकीय ब्रँड, जो स्वतःच्या पक्षाच्या मर्यादेपलिकडेही चालेल असा निर्माण होणार नाही, तोपर्यंत बाळासाहेब नावाच्या ब्रँडला डग नाही!!… मग हे उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना आवडो अथवा न आवडो!! राजकीय वस्तुस्थिती बदलणार नाही.
Balasaheb Thackeray : biggest political brand beyond party lines in maharashtra
महत्वाच्या बातम्या
- ममतांवर टीका करणाऱ्या काँग्रेस प्रवक्त्याला अटक; केरळमध्ये एशिया नेट वर पोलिसांचे छापे; पण बीबीसी वरील छाप्यानंतर ओरडणारे लिबरल्स गप्प!!
- रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी फोडून उद्धव ठाकरे खेडच्या सभेत शिंदे – भाजप आणि निवडणूक आयोगावर बरसले!!
- ठाकरेंची नवी घोषणा, आता जिंकेपर्यंत लढायचं!!; पण जिंकल्यानंतर काय करायचं??; हा खरा प्रश्न!!
- फेसबुक लावणार युजर्सना रील्सचे वेड