विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडले. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत सुमारे 68 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत 71 टक्के मतदान झाले होते, त्या तुलनेत आज झालेल्या पोटनिवडणुकीत 3 टक्के मतदान कमी झाले आहे.68 per cent turnout in Pandharpur-Mangalwedha Assembly by-election; Counting on May 2
पंढरपूरचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधना नंतर रिक्त झालेल्या जागेवर आज आज पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात शांततेत व सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्यात अटीतटीची लढत झाली असली तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील व अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांनी ही आपली शक्ती पणाला लावली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने 524 मतदान केंद्रांची व्यवस्था केली होती. या सर्व केंद्रावर सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत मतदान घेण्यात आले.दोन मे रोजी होणाऱ्या मतमोजणीत कोण बाजी मारणार, याकडेच संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.