नाशिक : केवळ सावरकरांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर अजितदादांना घेरून ते वठणीवर येतील का??, असा सवाल अजित पवार आणि भाजप नेते यांच्या दुहेरी राजकारणातून समोर आलाय.Will they come to the rescue by surrounding Ajitdada just on the issue of Savarkar’s honor
अजित पवारांनी भाजपच्या अपेक्षेप्रमाणे स्वतःचे लक्ष पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांवर केंद्रित केले. इतर महापालिकांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी लक्ष सुद्धा घातले नाही. पण पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये लक्ष घालताना अजित पवारांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला टार्गेट केले. भाजपचे स्थानिक नेतृत्व भ्रष्टाचारी आहे. त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडचा कारभार बिघडवून टाकला, असा आरोप अजित पवारांनी केला.
या आरोपाकडे सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष दिले नाही. पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांतदादा पाटील यांना त्या आरोपांवर लक्ष दिल्याशिवाय राहावले नाही. रवींद्र चव्हाण बावनकुळे आणि चंद्रकांतदादांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले.
– आशिष शेलारांचे टीकास्त्र
पण तेवढ्याने भागले नाही. कारण अजितदादांनी स्वतःचा आक्रमकपणा सोडला नाही. त्यामुळे आज आशिष शेलार यांनी सुद्धा अजितदादांवर टीकास्त्र सोडले. यासाठी त्यांनी सावरकरांच्या सन्मानाचा मुद्दा हातात उचलला. आम्ही सावरकरांच्या विचारांचे अनुयायी आहोत. अजित पवारांना सावरकरांचे विचार मान्यच करावे लागतील. अन्यथा सावरकरी विचारानुसार बरोबर आला तर ठीक, नाही आला तर तुमच्याशिवाय आणि विरोधात गेला तर तुमचा विरोध डावलून आम्ही आमचे काम करत राहू, असे आशिष शेलार म्हणाले.
– अमोल मिटकरींचे प्रत्युत्तर
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आशिष शेलार यांना प्रत्युत्तर दिले. आमचा पक्ष शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा आहे. त्या विचारांवर आम्ही ठाम आहोत तुमच्या “आदर्शानुसार” आमचा पक्ष चालावा, अशी अपेक्षा असेल, तर तसे होणार नाही. उलट आंबेडकरी विचारांवर नाईलाजाने तुमच्या पक्षाला चालावे लागते, असा टोमणा अमोल मिटकरी यांनी मारला.
– फडणवीसांचा दुजोरा
आशिष शेलार यांच्या या वक्तव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जळगावतून दुजोरा दिला. सावरकरांना कोणी विरोध करत असेल तर तो आम्हाला मान्य नाही पण अजित पवारांनी सावरकरांच्या विचाराचा कधी विरोध केलेला दिसत नाही. त्यांनी कधी सावरकरांच्या विचारांचा विरोध केल्याचे मला माहिती नाही. पण काही झाले तरी आमची भूमिका ठाम आहे. सावरकरांच्या विचारांचा विरोध आम्हाला मान्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले.
– मूळ मुद्दाच मागे पडला
पण वादाच्या या सगळ्या घोळात मूळ मुद्दा मागे पडला. अजितदादांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर टीका केली होती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर टीका केलीच नव्हती शिवाय त्यांनी सावरकरांच्या बद्दलही गैरउद्गार काढण्याचे कुठे प्रसिद्ध झाले नव्हते, तरी देखील भाजपच्या नेत्यांनी सावरकरांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर अजित पवारांना का घेरले असावे??, असा सवाल समोर आला.
– भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाई करणार की नाही??
वास्तविक चंद्रशेखर बावनकुळे यांनी 70000 कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा विषय काढून अजितदादांना कॉर्नर केलेच. पण प्रत्यक्षात भाजपने त्यांच्या विरोधात कुठली कारवाई केली नाही. 70000 कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचे जाऊ द्या. त्या घोटाळ्याचा विषय कोर्टात रेंगाळलाय. पण अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारचा पुण्यातल्या मुंढव्यातला जमीन घोटाळा हा तर नवीन विषय आहे. जोपर्यंत पार्थ किंवा त्याची अमेडिया कंपनी 42 कोटी रुपये भरणार नाही, तोपर्यंत मुंढग्यातला जमीन व्यवहार रद्द देखील होणार नाही. पार्थ किंवा त्याच्या कंपनीकडून हे 42 कोटी रुपये वसूल करण्याचे काम तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयाकडे म्हणजेच महसूल मंत्रालयाकडे आहे. बावनकुळे यांनी ते जरी काम नीट केले, किंवा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना ते काम नीट करून दिले, तरीदेखील भाजपने अजित पवारांवर खऱ्या अर्थाने कुठलीतरी कारवाई केली, असे सिद्ध होईल. त्यामुळे भाजप सावरकरांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर अजित पवारांना नुसते घेरत राहणार, की त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई करून आपला प्रामाणिक हेतू सिद्ध करणार??, यावर अजित पवार आणि भाजप यांच्यातली लढाई खरी आहे, की केवळ नुरा कुस्ती आहे, हे सिद्ध होणार आहे आणि ते सिद्ध करायची जबाबदारी भाजपच्या नेत्यांवर आहे.
Will they come to the rescue by surrounding Ajitdada just on the issue of Savarkar’s honor
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे बंधूंचे फक्त मुंबई, ठाण्याकडे लक्ष; मराठवाडा, विदर्भाकडे पूर्ण दुर्लक्ष!!
- सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार काँग्रेसच्या नेत्यांनी केला हे खरेच, पण…
- महापालिका निवडणूक प्रचाराच्या धबडग्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तरेश्वराच्या यात्रेला दरे गावात!!
- दोन्ही मुलांना व्यवस्थित settle करून नारायण राणे सन्मानाने निवृत्तीच्या दिशेने…, पण…