Thursday, 8 May 2025
  • Download App
    NCP : सुप्रिया सुळे या "वाय. एस. शर्मिला" का होऊ शकत नाहीत?? Why can't supriya sule merge her outfit in Congress like y. s. sharmila in??, what is the hurdle??

    NCP : सुप्रिया सुळे या “वाय. एस. शर्मिला” का होऊ शकत नाहीत??

    शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या हातातून निसटून गेला. घड्याळ चिन्हही त्याबरोबर अजित पवारांनाच मिळाले. शरद पवारांना वयाच्या 84 व्या वर्षी नवा पक्ष स्थापन करून नवे चिन्ह घेण्याची वेळ पुतण्याने त्यांच्यावर आणली. पण ही सगळी राजकीय मशक्कत केवळ आपली कन्या खासदार सुप्रिया सुळे हिच्या राजकीय भवितव्याच्या चिंतेपोटी पवार करीत आहेत. Why can’t supriya sule merge her outfit in Congress like y. s. sharmila in??, what is the hurdle??

    पण महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर,  याच सुप्रिया सुळे आंध्र प्रदेश मधल्या “वाय. एस. शर्मिला” का होऊ शकत नाहीत??, असा सवाल तयार होतो. कारण तेलंगणा मधली निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेसला जो राजकीय कॉन्फिडन्स आला, त्या कॉन्फिडन्स मुळे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांची बहीण आणि माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांची कन्या वाय. एस. शर्मिला या स्वतःचा पक्ष गुंडाळून तो काँग्रेसमध्ये विलीनकर्त्या झाल्या. त्यामुळे वाय. एस. शर्मिला यांना राजकीय संजीवन तर मिळालेच, पण आंध्र प्रदेशच्या राजकारणामध्ये काँग्रेस एक बळकट पक्ष म्हणून उभा राहण्याची तयारी सुरू झाली.

    महाराष्ट्रात देखील सुप्रिया सुळे नवा पक्ष काढण्याऐवजी आपली ताकद घेऊन काँग्रेसमध्ये विलीन करू शकतात. कारण त्यांच्या वडिलांनी आणि त्यांनी स्वतःचा पक्ष आणि चिन्ह गमावले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातली काँग्रेस आमदार संख्येच्या बळावर चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची आमदार संख्या त्याहीपेक्षा कमी आहे. अशावेळी सुप्रिया सुळेंना स्वतंत्रपणे नवा राजकीय पक्ष उभा करून अवघ्या 3 महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुका आणि 6 – 8 महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणे आणि त्याचा मुकाबला करणे शक्य होणार आहे का??, हा फार महत्त्वाचा सवाल आहे. भले सुप्रिया सुळे यांच्याकडे त्यांच्या बाजूने वडील असतील, शरद पवारांचे नाव,त्यांचा ब्रँड उपलब्ध असेल, पण शरद पवार प्रत्यक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपल्या जुन्या वेगाने फिरू शकणार आहेत का??, प्रचार करू शकणार आहेत का?? हा ही तितकाच महत्त्वाचा सवाल आहे.


    सुप्रिया सुळे म्हणतात, यशवंतरावांचे माझ्यावर संस्कार म्हणून मी अजितदादांच्या आरेला कारे करत नाही; पण या संस्कारांचे खरे “रहस्य” काय??


    मी काय म्हातारा झालो का??, तुम्ही माझं काय बघितलं??, मी थांबणार नाही, मागे हटणार नाही वगैरे व्हिडिओ शेअर करणे निराळे आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरून प्रचाराचा धुरळा उडवून देणे निराळे!! पवारांना वयाच्या 84 व्या वर्षी हे सगळे जमणार आहे का?? त्यांची तब्येत त्यांना तशी साथ देऊ शकेल का?? या सवालांचे उत्तर आज तरी कुणाकडे नाही… आहे तो फक्त आवेश आणि एका बाजूला मुलगी आणि दुसऱ्या बाजूला रोहित पवारांसारखा नातू!! (बाकी कुठलेही नेते पवारांच्या बाजूला उभेच राहतील याची कुठलीही गॅरंटी नाही!!)

    पण एवढ्याच भांडवलाच्या बळावर पवार आणि सुप्रिया सुळे आपला नवा पक्ष नवे चिन्ह घेऊन महाराष्ट्राच्या राजकीय भूमीत उभे राहू शकणार आहेत का?? तसे घडणारच नसेल तर मग सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात “वाय. एस. शर्मिला” बनणे शक्य आहे का??, हा सवाल आहे. म्हणजे थोडक्यात सुप्रिया सुळे आपली उरली सोडली ताकद घेऊन काँग्रेसमध्ये दाखल होऊ शकतील का??, हा तो सवाल आहे.

    सुप्रिया सुळे जर शरद पवारांची उरलीसुरली ताकद घेऊन काँग्रेसमध्ये दाखल झाल्या, तर काँग्रेसला एक वेगळाच राजकीय बूस्टर डोस मिळेल. सुप्रिया सुळे यांचे काँग्रेसच्या नेत्या म्हणून विशिष्ट पातळीवर बस्तान देखील बसू शकेल. त्या राहुल आणि प्रियांका गांधींशी जुळवूनही घेऊ शकतील, असे वरवर पाहता दिसते, पण नेमके तसेच घडेल का?? आणि सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या “वाय. एस. शर्मिला” होतील का??, हा मात्र सवाल कायम राहील.

    कारण वाय. एस. शर्मिला आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये काही मूलभूत फरक आहेत. वाय. एस. शर्मिला यांनी तेलंगणामध्ये काही काळ का होईना पण आपला स्वतंत्र पक्ष चालवून पाहिला. त्यांचे वडील वाय. एस. राजशेखर रेड्डी हे काँग्रेसचे आंध्र प्रदेश मधले सर्वात मोठे नेते होते. त्यांचा वारसा काँग्रेसने पुढे चालवू दिला नाही म्हणून वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी काँग्रेस विरुद्ध बंड करून वाय. एस. आर. काँग्रेस काढून पक्षाला सत्तेवर आणले. पण त्यांचे त्यांच्या बहिणीशी काही जमले नाही आणि म्हणूनच वाय. एस. शर्मिला वेगळ्या झाल्या. आज त्या काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून आंध्रमध्ये आपल्या भावासमोर तगडे आव्हान निर्माण करून उभ्या राहिल्या आहेत.

    मग सुप्रिया सुळे यादेखील काँग्रेसमध्ये जाऊन अजित पवारांसमोर तगडे आव्हान उभे करू शकतील का?? की त्यामध्ये कुठल्या वेगळाच अडथळा आहे??, हे पाहणे फार महत्त्वाचे आहे.

    – पवारांचे अविश्वासार्ह राजकारण

    वाय. एस. राजशेखर रेड्डी आणि शरद पवार यांच्यात फार महत्त्वाचा फरक आहे आणि तो थेट काँग्रेसशी संबंधित विश्वासार्हतेचा आहे. राजशेखर रेड्डी हे सोनिया गांधींच्या अतिशय विश्वासातले नेते होते. ते आत्ता हयात असते, तर आंध्र आणि तेलंगणाच्या राजकारणावर संपूर्ण प्रभाव पाडण्याची त्यांची क्षमता होती. किंबहुना सोनिया गांधी यांच्या विश्वासाच्या बळावर राष्ट्रीय राजकारणात देखील नाव कमावण्याची त्यांची ताकद होती. पण पवारांचे राजकारण मात्र सोनियांसाठी अजिबात विश्वासार्हतेचे नाही. सोनियांच्या परदेशी मूळाच्या मुद्द्यावरच तर पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली होती. त्यामुळे पवारांच्या अविश्वासार्हतेचे राजकीय ओझे सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर आहे. म्हणूनच सुप्रिया सुळे यांची कितीही “वाय. एस. शर्मिला” होण्याची इच्छा असली किंवा नसली तरी काँग्रेस त्यांना स्वतःच्या पक्षात प्रवेश देऊ आपल्या पक्षाची सूत्रे सुप्रिया सुळेंच्या आणि पर्यायाने शरद पवारांच्या हाती सोपवेल का??, हा सर्वांत कळीचा सवाल आहे आणि इथेच त्याचे नकारात्मक उत्तरही दडले आहे.

    शरद पवारांवर विश्वास ठेवून महाराष्ट्रातल्या काँग्रेसची सूत्रे सुप्रिया सुळे यांच्या हातात देणे म्हणजे स्वतःच्या पक्षाशी उरली सुरली वाट लावून घेणे आहे. काँग्रेस हायकमांड हे घडू देण्याची फारच कमी शक्यता आहे. किंबहुना तशी शक्यताच नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे यांची इच्छा असो अथवा नसो, त्या “वाय. एस. शर्मिला” बनू शकणार नाहीत, कारण “तसे” बनणे केवळ सुप्रिया सुळे यांच्या हातात नाही, तर ते काँग्रेस हायकमांडच्या हातात जास्त आहे आणि हायकमांड स्वतःच्या पायावर आणखी मोठा धोंडा पाडून घेण्याची शक्यता फार कमी आहे!!

    Why can’t supriya sule merge her outfit in Congress like y. s. sharmila in??, what is the hurdle??

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस

    द फोकस एक्सप्लेनर : भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’- 1971 नंतरचा सर्वात मोठा प्रतिहल्ल! 5 मुद्दे