विशेष प्रतिनिधी
मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड Walmik karad आणि सुदर्शन घुले यांना बीडच्या जेलमध्ये मारहाण झाल्याची बातमी सगळीकडे पसरली. परंतु प्रत्यक्षात त्या दोघांना तशी कुठलीही मारहाण झाली नसल्याचा खुलासा जेल प्रशासनाने केला, पण या खुलासानंतरही बाहेर राहिलेल्यांनी मात्र मारहाणीवर दावे – प्रतिदावे केले.
जेल मध्ये सकाळी न्याहारीची वेळ झाली म्हणून सगळ्यांना खुले केले. त्यावेळी मोबाईलच्या वादातून महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारले. गीते आणि आठवले हे दोघेही संतोष आंधळे प्रकरणातले आरोपी आहेत. त्या मारामारीत वाल्मीक कराडला देखील दोन-तीन थपडा बसल्या, अशी बातमी पसरली. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन “इनसाईड स्टोरी” सांगितली. त्यानंतर अंजली दमानिया यांनी देखील वाल्मीक कराडला दोन तीन थपडा बसल्या, असे सांगितले पण ही सगळी आपल्याला वेगवेगळ्या “सोर्सेस” मधून माहिती मिळाली, असे सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी सांगितले. कारण ते दोघेही जेलमध्ये नाहीत. ते बाहेर आहेत.
जेल प्रशासनाने मात्र मारामारी झाली, त्यावेळी वाल्मीक कराड आणि सुरेश सुदर्शन घुले तिथे नव्हतेच, असे स्पष्ट केले. मारामारी देखील किरकोळ झाल्याचे जेल प्रशासनाने सांगितले. पण या सगळ्या प्रकारावर मनोज जरांगे यांनी संशय व्यक्त केला. संतोष देशमुख प्रकरणातले सगळेच आरोपी सोंगे करणारे आहेत. त्यामुळे मारामारी झाली नसले तरी मारामारी झाली अशी ते बतावणी करतील. ते सगळे खोटे बोलत असतात. त्यामुळे मारामारी झाल्याच्या बातम्यांवर जेल प्रशासन अधिकृतपणे काही सांगत नाही तोपर्यंत बोलता येणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.