सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश Trimbakeshwar 2027 Kumbh Mela
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे बुधवारी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत बैठक संपन्न झाली. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिले. तसेच हा सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठी नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याच्या पाहणीसाठी गेलेल्या पथकाने नोंदविलेल्या सूचना व त्या अनुषंगाने सिंहस्थ कुंभमेळ्यात करावयाच्या सोयी-सुविधांचा यावेळी आढावा घेतला. सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन सुव्यवस्थित व्हावे, सर्व यंत्रणांचा समन्वय व्हावा, कुंभमेळ्याची कामे गतीने व्हावीत, यासाठी कुंभमेळा प्राधिकरण व कुंभमेळा प्राधिकरण कायदा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत दिले.
चार ते पाच पट गर्दीच्या अनुषंगाने जास्तीचे नियोजन करावे, नाशिक-त्र्यंबक रस्ता 24 मीटर वाढविण्यात यावा, या रस्त्यांच्या कडेला टेंट सिटी उभारण्यासंदर्भातही विचार करावा, गोदावरी नदीच्या काठावर किनारी रस्ता तयार करण्यासाठी ड्रोन सर्व्हे करावा, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी दिले.
मुंबई, जव्हार, गुजरात, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, धुळे, पुणे, मुंबई या मार्गातील रस्त्यांचे बळकटीकरण करावे, भाविकांसाठी ई बसचा पर्याय उपलब्ध करावा, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, ओझर या विमानतळावरही प्रवाशांचे नियोजन करावे, नाशिक शहरात हेलिपॅड उभारण्याचा विचार करावा, रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी नाशिक रोड, इगतपुरी, कसारा या स्थानकांमध्ये सोयी सुविधा निर्माण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिले.
त्र्यंबकेश्वर, शिर्डी, वणी, शनिशिंगणापूर, मांगीतुंगी या धार्मिक स्थळांचे कॉरिडॉर तयार करावे, नाशिकमधील राम काल पथाचे काम पुढील वर्षीपर्यंत पूर्ण करावे, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या संवर्धनाचे काम हाती घ्यावे, कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
सिंहस्थ कुंभमेळ्याचा लोगो निर्माण करण्यासाठी स्पर्धा घ्यावी, गोदावरी नदीचे पाणी वाहते राहण्यासाठी नियोजन करावे, तसेच साधुग्रामसाठी भूसंपादन, आरोग्य केंद्रे, अग्निशमन सुविधा आराखडा तयार करावा, नागरिकांपर्यंत माहिती जलदगतीने मिळण्यासाठी संपर्क यंत्रणा निर्माण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत प्रशासनाला दिले.
बैठकीस मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव, नाशिक जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.
Use digital technology and AI in planning Trimbakeshwar 2027 Kumbh Mela CM Fadnavis instructions
महत्वाच्या बातम्या
- नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ३००० रुपये वाढून देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा!!
- Bangladesh : बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला, कॉक्स बाजार एअरबेसवर दंगलखोरांचा हल्ला
- पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान निधीचा १९ वा हप्ता केला जारी
- प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा १९ वा हप्ता वितरित; ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २२००० कोटी रुपये जमा!!