विशेष प्रतिनिधी
सांगली : महाविकास आघाडीत हिंमत दाखवून ठाकरे – पवारांकडून जागा खेचून घेण्याची वेळ निघून गेली आणि नंतर सांगलीत काँग्रेसची खदखद नेत्यांच्या ओठांवर आली!! हे सांगलीत आज घडले. Upset Congress leaders decided to campaign for MVA in sangli, but very reluctantly
वसंतदादा पाटलांचा सांगलीचा बालेकिल्ला परस्पर खेळी करून शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या गळ्यात घातला. कोल्हापुरात शाहू महाराजांना काँग्रेसच्या तिकिटावर उभे करताना काँग्रेस नेत्यांना बरे वाटले. शाहू महाराजांच्या रूपाने खासदार संख्या वाढल्याची खुशीची गाजरे त्यांनी खाल्ली, पण त्याच्या बदल्यात पवारांनी परस्पर सांगलीची काँग्रेसची हक्काची जागा काढून ती उद्धव ठाकरेंना दिली, त्याची भनक देखील त्यावेळी काँग्रेस नेत्यांना लागली नाही, पण नंतर मात्र त्यांना जाग आली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती!! विशाल पाटलांनी आणि विश्वजीत कदम यांनी थेट दिल्ली गाठून भरपूर तक्रारी केल्या अगदी सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन सांगलीची जागा परत मागण्याची प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण त्याला ठाकरे – पवार बधले नाहीत. काँग्रेस नेत्यांना ठाकरे – पवारांवर मातच करता आली नाही. विशाल पाटलांनी बंडखोरी करून अर्ज दाखल केला पण त्यांना मर्यादा पलीकडे फारसा पाठिंबा मिळू शकला नाही.
या पार्श्वभूमीवर बऱ्याच दिवसांनी काँग्रेसने आज सांगलीत महामेळावा घेतला. त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विश्वजीत कदम, विशाल पाटील या सगळ्या नेत्यांची जोरदार भाषणे झाली. सांगली हा वसंतदादा पाटलांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला कसा आहे, वसंतदादांनी सांगलीचा असा विकास केला, तिथे काँग्रेस कशी रुजवली, वगैरे सगळी बहारदार वर्णने सगळ्या नेत्यांनी या महामेळाव्यात केली.
पण पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र आजचे राजकीय वास्तव मांडले. अत्यंत नाईलाजाने महाविकास आघाडी करावी लागली आणि त्याची किंमत सांगलीच्या बालेकिल्ल्याच्या रुपाने चुकवावी लागली, अशी कबुली पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली, आज महाविकास आघाडीचा धर्म पाळून सांगलीत प्रचाराचा निर्णय काँग्रेस नेत्यांनी घेतला, पण सांगलीची जागा पुन्हा एकदा काँग्रेसकडेच खेचून घेण्याचे सगळ्या वक्त्यांनी आव्हान स्वीकारण्याचे सांगितले. पण सगळ्या नेत्यांच्या ओठांवर सांगलीची खदखद आली, पण तोपर्यंत ठाकरे – पवारांकडून जागा खेचून घेण्याची वेळ मात्र निघून गेली होती!!