विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले यश मिळवून मनातली महिला मुख्यमंत्री करण्याचा मनसूबा अखेर शरद पवारांनी शिरूर तालुक्यातल्या वडगाव रासाई इथल्या जाहीर सभेत बोलून दाखवला. त्या संदर्भातल्या बातम्या विविध प्रसार माध्यमांनी दिल्या. त्यावर महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा देखील झाली, पण एवढी होऊन देखील पवारांच्याच महाविकास आघाडीत असलेले उद्धव ठाकरे मात्र याविषयी “अनभिज्ञ” राहिले. त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी पवारांच्या पक्षातल्या कुठल्याही महिलेचे नाव न घेता वेगळेच नाव घेऊन टाकले. त्यामुळे महाविकास आघाडीतले ठाकरे आणि पवारांचे मतभेद पुन्हा एकदा समोर आले.
शरद पवारांच्या मनातल्या महिला मुख्यमंत्र्याची चर्चा मराठी माध्यमांनी गेली काही वर्षे सातत्याने आणि टप्प्याटप्प्याने चालवली होती. लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली ही चर्चा विधानसभा निवडणुकीपर्यंत विशिष्ट पातळीवर आणून ठेवायची खुबी पवारांनी साधून घेतली. त्यांनी स्वतःहून मनातल्या मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीरपणे कधी घेतले नाही, पण महिला मुख्यमंत्री करायची तर ती सुप्रिया सुळे जातील याची चर्चा मात्र पवारनिष्ठ माध्यमे घडवत राहिली.
अखेर पवारांनी शिरूर तालुक्यातल्या वडगाव रासाईच्या जाहीर सभेत महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळाली पाहिजे, असे जाहीररित्या बोलून दाखविले. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. या विषयापासून उद्धव ठाकरे यांच्यासारखे चाणाक्ष नेते बाजूला राहणे शक्यच नव्हते. परंतु त्यांनी देखील चाणाक्षपणे शरद पवारांच्या पक्षातला मुख्यमंत्री पदाचा विषय वेगळ्याच नावाने समोर आणला. शरद पवारांच्या “मनातले नाव” त्यांनी बिलकुल घेतले नाही. त्यांनी सुरुवातीला जयंत पाटलांचे नाव पुढे केले आणि आता तर जितेंद्र आव्हाडांचे नाव पुढे करून उद्धव ठाकरेंनी वेगळीच सोंगटी पुढे सरकवली.
त्यामुळे पवारांच्या फुटलेल्या राष्ट्रवादीत सुद्धा मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तीव्र झाली. त्या तुलनेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत तशी स्पर्धा शिल्लक राहिलेली नाही. कारण उद्धव ठाकरेंचे नाव समोर आले की, बाकी दुसऱ्या कोणाचे नाव घेण्याची हिंमत आता त्यांच्या शिवसेनेत उरलेली नाही.
Uddhav thackeray took the of jitendra awhad and not supriya sule
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis attack देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; मतांसाठी मविआचे नेते उलेमाचे तळवे चाटत आहेत
- Ramgiri Maharaj रामगिरी महाराज : ट्रम्पच्या निवडणुकीत हिंदूंची एकजूट उपयोगी ठरू शकते, तर भारतात का नाही उपयोगी ठरणार??
- Virat Kohli : विराट कोहली जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी बरा झाला नाहीतर…
- Piyush Goyal : पियुष गोयल यांचा वाहन कंपन्यांना सल्ला ; ‘विक्री वाढवण्यासाठी…’