विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंच्या कौटुंबिक लग्न सोहळ्यांमध्ये झाल्या भेटी, पण परफॉर्मन्सचा तळ गाठल्यानंतर तरी राजकारणात पडतील का गाठी??, असा सवाल त्यामुळे तयार झाला.
केल्या साधारण महिनाभरामध्ये उद्धव आणि राज ठाकरेंच्या कौटुंबिक लग्न सोहळ्यात दोनदा भेटी झाल्या. आधी रश्मी ठाकरे यांच्या भाच्याच्या लग्नात भेट झाली होती. आज राज ठाकरेंच्या भाच्याच्याच लग्नात उद्धव आणि राज यांची भेट झाली. दोघांनी एकमेकांशी दोन्ही वेळी संवाद साधला. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली.
उद्धव आणि राज ठाकरे यांच्या दुसऱ्या भेटीनंतर तर ती चर्चा अधिकच वाढली. पण त्या चर्चेमध्ये केवळ राजकारणापेक्षा अपेक्षांचा भाग मोठा आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षांनी परफॉर्मन्सचा तळ गाठला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फक्त 20 आमदार निवडून आणता आले. राज ठाकरेंच्या मनसेला, तर एकही आमदार निवडून आणता आला नाही. बाळासाहेब ठाकरे नावाचा ब्रँड हा एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन तिथे तो यशस्वी ठरला. भाजपने देखील सावरकर आणि बाळासाहेबांचे हिंदुत्व या विषयावर आपलाच कॉपीराईट असल्याचा हक्क दाखवून टाकला. या सगळ्याचा एकत्रित फटका दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षांना बसला.
पण तरी देखील शिवसैनिकांना आणि मनसैनिकांना एक अपेक्षा आहे की, जर दोन ठाकरे बंधू एकत्र आले, तर महाराष्ट्रात राजकीय वातावरण बदलण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. या दोघांनी आपापसांत पॅचअप करून दोन पक्ष जरी वेगळे ठेवले, त्यांनी तरी युती किंवा आघाडी करावी. त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये मोठा फरक पडेल, असे दोन्ही पक्षातल्या सैनिकांची अपेक्षा आहे.
महापालिका निवडणुकांमध्ये शक्य असेल तिथे मनसे राज ठाकरेंच्या मनसे पक्षाशी युती करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच करून ठेवले आहे. पण त्यामुळे फक्त भाजप साठी ऑप्शन खुला आहे. राज ठाकरे यांना त्या ऑप्शन मधून नेमके काय मिळणार??, हे अजून स्पष्ट झालेले नाही. या पार्श्वभूमीवर दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का आणि आले तर त्याचा कसा लाभ होईल??, याची चर्चा शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये जोरदार सुरू आहे.