नाशिक : आपल्या ताकदींपेक्षा आकड्यांची मागणी मोठी करून महाविकास आघाडी ठाकरे आणि महायुतीमध्ये अजितदादा आपापल्या मित्र पक्षांसाठी डोकेदुखीच ठरत आहेत. मुंबईत “सांगली” करण्याचा निर्णय घेऊन उद्धव ठाकरे 36 पैकी 25 जागांवर दावा ठोकण्याच्या बेतात आहेत, तर महायुतीमध्ये 288 जागांवर सर्वे करून त्यापैकी 80 जागांवर ताबा सांगण्याचा अजितदादांच्या पक्षाचा प्रयत्न आहे. एकूण ठाकरे आणि अजितदादा आपापल्या मित्र पक्षांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. कारण हे दोन्ही नेते आपापल्या सध्याच्या मित्र पक्षांच्या अनैसर्गिक युतीमध्ये आहेत. Uddhav thackeray and ajit pawar are political headaches in MVA and Mahayuti
उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतला आपला सिंहाचा वाटा खेचून घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत. मुंबईसारख्या बालेकिल्ल्यात 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 25 जागांवर त्यांनी दावा ठोकल्याचे बोलले जात आहे. यामध्ये काँग्रेसचे काही मतदारसंघ आहेत. त्यामुळे सांगलीत जसा ठाकरे यांनी काँग्रेसचा गेम करायचा प्रयत्न केला, तसाच प्रयत्न शिवाजीनगर मानखुर्द किंवा अन्य काही मतदारसंघांमध्ये ठाकरे करण्याची शक्यता आहे. 36 पैकी 25 मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिल्यानंतर उरलेल्या 11 मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी जागा वाटपाचा कोणता “दिवा” लावणार हे दिसूनच येत आहे!! त्यामुळे महाविकास आघाडीत प्रत्यक्ष जागा वाटपाची चर्चा सुरू होण्यापूर्वीच वादाची ठिणगी पडल्याचे हे उघड दिसते आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीमध्ये जागावाटप होऊन 36 पैकी 32 मतदार संघांमध्ये युतीने विजय मिळवला होता. यापैकी 17 मतदारसंघात शिवसेना आणि 12 मतदारसंघात भाजपचा विजय झाला होता. काँग्रेस – राष्ट्रवादीचा दणकून पराभव झाला होता. पण त्यावेळी ठाकरे भाजपबरोबरच्या नैसर्गिक युतीमध्ये होते. आता ते महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शरद पवारांबरोबरच्या अनैसर्गिक युतीमध्ये आहेत. त्यामुळे मुंबईतली ठाकरेंची दादागिरी काँग्रेस आणि शरद पवार सहन करणार??, की विधान परिषद निवडणुकीत पवारांचा उमेदवार पाडून ठाकरेंनी आपले वर्चस्व राखले, तसेच वर्चस्व ठाकरे विधानसभा निवडणुकीतल्या जागा वाटपात राखणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
– महायुतीत अजितदादांची दादागिरी चालणे अवघड
जे महाविकास आघाडीत ठाकरेंचे, तेच महाविकास आघाडीत अजितदादांचे सुरू आहे. अजितदादांचा पक्ष भाजप बरोबरच्या महायुतीत रेटारेटी करून 80 जागा मिळवण्याचा आग्रह धरून बसला आहे. लोकसभा निवडणुकीत अजितदादांच्या पक्षाच्या चिंध्या झाल्या. त्यांचा परफॉर्मन्स पूर्ण खाली आला. त्यामुळे भाजपमध्येच अजितदादांना महायुती ठेवण्याविषयी प्रचंड नाराजी आहे. संघाच्या मुखपत्रांनी तर थेटच अजितदादा विरोधी भूमिका घेतली आहे. तरी देखील अजितदादा महायुतीत रेटारेटी करण्याच्या मनःस्थितीत दिसत आहेत.
वास्तविक अजितदादा महायुतीमध्ये अनैसर्गिक मित्र पक्ष आहेत. काँग्रेस बरोबरच्या आघाडीमध्ये दादागिरी करून जास्त जागा खेचून घेण्याची त्यांची सवय होती. पण इथे भाजपबरोबरच महायुतीत अजितदादांची दादागिरी चालण्याची शक्यता कमी आहे. केंद्रातल्या भाजपच्या वरिष्ठांनी कायद्याचा बडगा दाखवल्यावर अजितदादांना खाली येणे भाग आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 80 जागा लढेल, असे जरी म्हटले असले तरी प्रत्यक्षात महायुतीतल्या मित्र पक्षांकडून त्या 80 जागा खेचून घेणे अजितदादांसाठी परफॉर्मन्सच्या आधारे अवघड आहे.
Uddhav thackeray and ajit pawar are political headaches in MVA and Mahayuti
महत्वाच्या बातम्या
- ट्रम्प यांच्या समर्थनासाठी पुढे आले भारतवंशी रामास्वामी- निक्की हेली; ते राष्ट्राध्यक्ष असताना पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केला नव्हता!
- श्रीलंका अंडर-19 क्रिकेटच्या माजी कर्णधाराची हत्या; घरात घुसून झाडली गोळी
- पवारांच्या भरवशावर उभा राहिलेले शेकापचे उमेदवार पडल्यामुळे काँग्रेस 7 आमदारांवर “कठोर” कारवाई करेल का??
- अग्निवीर योजनेवर काँग्रेसची आगपाखड; पण हरियाणात अग्निवीरांवर सवलतींचा वर्षाव!