विशेष प्रतिनिधी
पुणे : Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एका सरकारी अधिकाऱ्याला “गोट्या खेळत होतास का? खिशातून हात काढ!” अशा शब्दांत खडसावल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटरवरून त्यांच्यावर टीका केली. “जसे काका, तसाच पुतण्या? रोहित पवारांची ही कोणती भाषा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अंजली दमानिया यांच्या ‘निवडक भूमिका’ घेण्याच्या पद्धतीवर ट्विटद्वारे जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर, “माननीय सुषमाताई, तुमचं ट्विट वाचून गंमत वाटली,” असं म्हणत अंजली दमानिया यांनी प्रत्युत्तर दिलं. या वादात आता रोहित पवार यांनीही उडी घेत अंजली दमानिया यांना तीन प्रश्न विचारले आहेत.
रोहित पवार यांचे अंजली दमानिया यांना प्रश्न
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं, “माननीय अंजलीताई, सुषमाताई अंधारे यांना दिलेलं तुमचं प्रत्युत्तर वाचून केवळ गंमतच वाटली नाही, तर काही शंकाही दूर झाल्या. तुमच्या भूमिका ‘प्रामाणिक’ असतात याबाबत कोणतीही शंका नाही. पण, तुमच्या भूमिका निवडक (सिलेक्टिव्ह) असतात, असा सर्वसामान्यांचा समज आहे. आम्हाला यावर विश्वास नसला, तरी खालील तीन मुद्दे पुराव्यासह तुमच्या नजरेस आणून देतो.”
- मुख्यमंत्र्यांचा खर्च : आज शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्र्यांच्या बेडरूममधील गादी आणि सोफ्यासाठी 20 लाख रुपये खर्च होतात, हे योग्य आहे का? तसेच, शेकडो कोटी रुपये जाहिरातबाजीसाठी खर्च करणं बरोबर आहे का?
- मेघा इंजिनिअरिंग प्रकरण : मेघा इंजिनिअरिंग कंपनीने बेकायदेशीर उत्खनन केल्याने तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी 95 कोटींचा दंड ठोठावला आणि त्यांचं साहित्य जप्त केलं. परंतु, महसूलमंत्र्यांनी केवळ 17 लाख रुपये दंड आकारून जप्त साहित्य परत करण्याचे आदेश दिले. हे योग्य आहे का?
- सिडको जमीन घोटाळा : सिडकोची 5000 कोटींची जमीन मंत्री संजय शिरसाट यांनी बेकायदेशीरपणे बिवलकर नावाच्या खासगी व्यक्तीला दिली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना 12,000 पानांचे पुरावे देऊनही त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. हे बरोबर आहे का?
रोहित पवार यांनी पुढे लिहिलं, “या मुद्द्यांवर तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करून शंका निर्माण करणाऱ्यांचे गैरसमज दूर करावेत. अन्यथा, लोक तुम्हाला अण्णा हजारे यांच्याच पंक्तीत बसवतील. शुभेच्छा!”
सुषमा अंधारे यांची टीका
रोहित पवार यांच्यावर अंजली दमानिया यांनी टीका केल्यानंतर सुषमा अंधारे यांनीही दमानिया यांच्यावर निवडक भूमिकांबाबत हल्लाबोल केला. त्यांनी ट्विटद्वारे म्हटलं, “अंजली दमानिया यांचं व्यक्तिमत्त्व मला नेहमीच गूढ वाटतं. चंद्रशेखर बावनकुळे आणि मेघा इंजिनिअरिंग कंपनी यांच्यातील संबंधांवर जोरदार चर्चा सुरू आहे. या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने कंत्राट दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं. पण, दमानिया यांनी बावनकुळे यांचं नावही घेतलं नाही. मात्र, जयंत पाटील यांच्याबाबत वापरल्या गेलेल्या आक्षेपार्ह भाषेवर त्या चकार शब्द बोलल्या नाहीत. पण, रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघातील निकृष्ट कामांबाबत जाब विचारला, तर त्या लगेच मैदानात उतरतात. भाजपच्या नेत्यांची शिवराळ भाषा किंवा मंत्र्यांचे भ्रष्टाचार त्यांना दिसत नाहीत. पण, पवार किंवा ठाकरे आडनाव समोर येताच त्यांना लढण्याची ऊर्मी येते. हे खरंच गूढ आहे!”
अंजली दमानिया यांचा पलटवार
यावर अंजली दमानिया यांनी ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिलं, “माननीय सुषमाताई, तुमचं ट्विट वाचून मजा वाटली. मी कोणत्या राजकीय पक्षात नाही, त्यामुळे प्रत्येक विषय मला माहीत असणं शक्य नाही. पण, माझ्यापर्यंत गंभीर विषय येतात, तेव्हा मी ते कधीच सोडत नाही. मी उगाच बोलत नाही. विषय घ्यायचा, चिघळवायचा आणि दुसऱ्या दिवशी विसरायचा, हा माझा स्वभाव नाही. मेघा इंजिनिअरिंग प्रकरणावर उद्धव ठाकरे का बोलत नाहीत? त्यांनी यावर बोलायला हवं. तुम्ही कायदेशीर लढाई का लढत नाही? तुम्ही PIL दाखल केली, तर मी तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईन. नसता, माझ्याकडे कागदपत्रं पाठवा. भ्रष्टाचाराविरुद्ध कसं लढायचं, याचा प्रत्यय मी तुम्हाला देईन. निवडक लढे आम्ही कोणत्याही गटासाठी लढत नाही!”
Twitter dispute between Rohit Pawar, Anjali Damania and Sushma Andhare
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींचा ‘व्होट चोरी’ बॉम्ब फुसका, आरोप निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरच उघडे
- सहा वर्षांत एकही निवडणूक नाही! 474 पक्षांचा ‘गेम ओव्हर’
- सध्या भारतात “दुबळे” पंतप्रधान; तर मग यासीन मलिकला हाफिज सईदच्या भेटीला पाकिस्तानात पाठवणारे पंतप्रधान “बळकट” होते का??
- BAPS organization : अमेरिकेतील BAPS संस्थेविरुद्धचा तपास बंद; न्यू जर्सी मंदिर प्रशासनावर कामगारांचे शोषण- मानवी तस्करीचा होता आरोप